संघर्ष साेडविण्यासाठी प्रयत्न करणार; युक्रेनमधील परिस्थितीवरून नरेंद्र मोदींची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 05:34 AM2023-05-22T05:34:59+5:302023-05-22T05:35:17+5:30

कायद्याने उपाय सापडला तर तो मान्य करायला हवा आणि याच भावनेने भारताने बांगलादेश सोबतचा भूमी आणि सागरी सीमा वाद सोडवला, असेही त्यांनी सांगितले. 

Will try to resolve conflict; Narendra Modi's testimony on the situation in Ukraine | संघर्ष साेडविण्यासाठी प्रयत्न करणार; युक्रेनमधील परिस्थितीवरून नरेंद्र मोदींची ग्वाही

संघर्ष साेडविण्यासाठी प्रयत्न करणार; युक्रेनमधील परिस्थितीवरून नरेंद्र मोदींची ग्वाही

googlenewsNext

हिरोशिमा (जपान) : युक्रेनमधील सध्याची परिस्थिती हा राजकारणाचा किंवा अर्थव्यवस्थेचा प्रश्न नाही तर, मानवता आणि मानवी मूल्यांचा मुद्दा आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जी-७ शिखर परिषदेत व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय कायदा, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी सर्व देशांना केले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत ते म्हणाले की, हा संघर्ष सोडवण्यासाठी जे काही शक्य असेल ते भारत करेल.
हिरोशिमा येथील जी-७ परिषदेत संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी स्थिती बदलण्याच्या एकतर्फी प्रयत्नांविरुद्ध एकत्रितपणे आवाज उठवण्याचे आवाहन केले. कोणताही तणाव आणि वाद शांततेने संवादाद्वारे सोडवला गेला पाहिजे, असेही ते म्हणाले. कायद्याने उपाय सापडला तर तो मान्य करायला हवा आणि याच भावनेने भारताने बांगलादेश सोबतचा भूमी आणि सागरी सीमा वाद सोडवला, असेही त्यांनी सांगितले. 

सध्याच्या जागतिक परिस्थितीत अन्न, इंधन आणि खतांच्या संकटाचा सर्वाधिक आणि गंभीर परिणाम विकसनशील देशांना जाणवतो. शांतता, स्थैर्य आणि समृद्धी हे आपल्या सर्वांचे समान उद्दिष्ट आहे. आजच्या एकमेकांशी जोडलेल्या जगात, कोणत्याही एका क्षेत्रातील तणावाचा सर्व देशांवर परिणाम होतो आणि मर्यादित संसाधने असलेल्या विकसनशील देशांना सर्वात जास्त फटका बसतो.  
    - पंतप्रधान मोदी 


भगवान बुद्धांची शिकवण उपयोगी  
n भगवान बुद्धांचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, आधुनिक युगात अशी कोणतीही समस्या नाही, ज्याचे निराकरण त्यांच्या शिकवणीत सापडत नाही. 
n आपण या भावनेने सर्वांसोबत एकत्र पुढे जाऊ. आज जग ज्या युद्ध, अशांतता आणि अस्थिरतेला तोंड देत आहे, त्यावर भगवान बुद्धांनी अनेक शतकांपूर्वी उपाय सांगितला होता.


दहशतवादाची व्याख्याही  का मान्य नाही?
हिरोशिमा : संयुक्त राष्ट्रे आणि सुरक्षा परिषदेत जर सध्याच्या जगाचे वास्तव प्रतिबिंब दिसत नसेल तर ते फक्त चर्चेचे दुकान (टॉक शॉप) बनून राहील, अशी चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आणि यामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली. शांतता आणि स्थैर्याबद्दल वेगवेगळ्या मंचांवर का बोलावे लागते? शांतता प्रस्थापित करण्याच्या विचाराने सुरू झालेले संयुक्त राष्ट्रे आज संघर्ष रोखण्यात यशस्वी का होत नाहीत?, असा सवाल मोदींनी केला. ते म्हणाले की, दहशतवादाची व्याख्याही संयुक्त राष्ट्रांमध्ये का मान्य करण्यात आली नाही?

मोदी-सुनक यांच्यात चर्चा   
नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी व्दिपक्षीय संबंधावर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य आणखी मजबूत करण्यावर सहमती दर्शवली. 

पीस मेमोरियल म्युझियमला भेट 
हिरोशिमा शहरावर झालेल्या अणुहल्ल्यात बळी पडलेल्यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या हिरोशिमा पीस मेमोरियल म्युझियमला पंतप्रधान मोदी यांनी रविवारी भेट दिली आणि आदरांजली अर्पण केली. 

Web Title: Will try to resolve conflict; Narendra Modi's testimony on the situation in Ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.