युद्धाचा भडका उडणार का? नेतन्याहू डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 08:50 IST2025-02-03T08:50:34+5:302025-02-03T08:50:55+5:30
अरब राष्ट्रांसोबतच्या द्विपक्षीय संबंधावर ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी अमेरिकेला रवाना होणार आहेत. मंगळवारी व्हाइट हाउसमध्ये ट्रम्प व नेतान्याहू यांच्यात चर्चा होणार आहे.

युद्धाचा भडका उडणार का? नेतन्याहू डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करणार
तेल अवीव : इराणचा सामना करण्यास आणि हमासवर विजय मिळण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट केले.
हमास इस्रायल संघर्षावर तोडगा काढण्यासाठी, तसेच अरब राष्ट्रांसोबतच्या द्विपक्षीय संबंधावर ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी अमेरिकेला रवाना होणार आहेत.
मंगळवारी व्हाइट हाउसमध्ये ट्रम्प व नेतान्याहू यांच्यात चर्चा होणार आहे. गाझा पट्टीवरील युद्ध थांबवण्यासाठी तसेच ओलिसांची व कैद्यांची अदलाबादली करण्यासाठी युद्धबंदी कराराच्या पुढील टप्प्यातील मध्यस्थीचे अत्यंत कठीण काम अमेरिका व अरब राष्ट्रांकडून सुरू असताना ट्रम्प व नेतन्याहू यांची बैठक होत आहे.
युद्धाचा भडका उडणार का?
हमासवर विजय मिळवणे व ७ ऑक्टोबर २०२३ च्या हल्ल्यानंतर अपहरण झालेल्या ओलिसांची सुटका करण्यास इस्रायल कटिबद्ध असल्याचे नेतान्याहू यांनीदेखील स्पष्ट केले होते.
मात्र, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची इस्रायल-हमास युद्धाबद्दल काय भूमिका आहे, हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे ट्रम्प-नेतान्याहू भेटीनंतर हमास-इस्रायल संघर्ष थांबणार की पुन्हा युद्धाचा भडका उडाणार याबद्दल चित्र स्पष्ट होईल.
युक्रेनला चर्चेतून बाहेर ठेवणे अत्यंत धोक्याचे : झेलेन्स्की
कीव : युक्रेनला अमेरिका आणि रशियामधील संघर्षावरील चर्चेतून वगळणे ‘अत्यंत हानिकारक’ ठरेल, असे युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. झेलेन्स्की यांनी युद्धबंदी योजना तयार करण्यासाठी युक्रेन आणि वॉशिंग्टनमध्ये पुढील चर्चा करण्याचे आवाहनही केले.
झेलेन्स्की म्हणाले की, रशिया युद्धबंदी चर्चेत भाग घेऊ इच्छित नाही किंवा कोणत्याही मदतीवर चर्चा करू इच्छित नाही. जर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाविरुद्ध ऊर्जा आणि बँकिंग निर्बंध लादण्याची धमकी दिली, तर पुतिन यांना चर्चेत येण्यास भाग पाडले जाऊ शकते.
मला वाटते की, हे सर्वांत महत्त्वाचे पाऊल आहे. शुक्रवारी ट्रम्प यांनी अमेरिका आणि रशियन अधिकारी युद्ध संपवण्याबद्दल ‘चर्चा’ करत असल्याचे म्हटल्यानंतर झेलेन्स्की यांची ही टिपणी आली.