ही महिला ठरू शकते किम जोंगची उत्तराधिकारी, याआधीही दाखवलेत नेतृत्वगुण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 07:14 PM2020-04-21T19:14:46+5:302020-04-21T20:14:49+5:30
शास्त्रक्रियेनंतर किम जोंगची प्रकृती बिघडली असून, एका बंगल्यात बनवण्यात आलेल्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, तो ब्रेन डेड झाल्याचाही दावा करण्यात येत आहे.
सियोल - उत्तर कोरियाचा माथेफिरू हुकूमशाह किम जोंग ऊन याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. एक जटिल शास्त्रक्रियेनंतर किम जोंगची प्रकृती बिघडली असून, एका बंगल्यात बनवण्यात आलेल्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, तो ब्रेन डेड झाल्याचाही दावा करण्यात येत आहे. त्यामुळे किम जोंगचा उत्तराधिकारी कोण असेल याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
आता किम जो ऊनची उत्तराधिकारी म्हणून त्याची बहीण किम यो जोंग हिचे नाव आघाडीवर आहे. किम यो जोंग हिचा निर्णय घेणाऱ्या प्रमुख समितीत पुन्हा समावेश करण्यात आल्यानंतरच किम जोंगची प्रकृती बिघडल्याने संकेत मिळू लागले होते. किम यो जोंग ही किम जोंग ऊनची सल्लागार राहिली आहे.
किम यो जोंग हिने 2018 मध्ये हिवाळी ऑलिम्पिकदरम्यान आपल्या भावाच्या जागी देशाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर सत्ताधारी पक्षात तिचे वजन वाढले होते. तसेच किम जोंग ऊनची परराष्ट्रात प्रतिमा बनवण्यामागे किम यो जोंग हिचाच मोठा वाटा होता. कुणावरही विश्वास न ठेवणारा आणि अगदी आपल्या जवळच्या नातेवाईकांची हत्या करणारा किम जोंग आपल्या बहिणीवर मात्र खूप विश्वास ठेवतो.
31 वर्षीय किम यो जोंग ही उत्तर कोरियाचे दिवंगत हुकूमशहा किम जोंग इल यांची सर्वात लहान मुलगी आहे. आता किम जोंग ऊनचा मृत्यू झाल्यास किम यो जोंग हिच्याकडे सत्ता सोपावण्याशिवाय कुठलाही पर्याय नसेल.