Iphone 6 ऐवजी महिलेला बॉक्समध्ये मिळाले बटाटे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 12:56 PM2017-11-28T12:56:14+5:302017-11-28T18:50:27+5:30
ऑनलाईन व्यवहार करताना चुकीची वस्तु येणं हे ठीके पण दुकानातून घेतानाही असं झालं तर ?
विस्कॉन्सीन - ऑनलाईन साईट्सवरून मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक वस्तू मागवल्यावर साबणाच्या वड्या, चिप्स असे पदार्थ डिलिव्हर झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन वस्तू मागवल्यावर आधी आपण बॉक्समध्ये काय आहे हे तपासून घेतो, आणि मगच पुढचा व्यवहार करतो. पण जर एका स्टॉलवरून आयफोन ६ खरेदी केल्यावर घरी आल्यानंतर ते बटाटे आहेत असं समोर आलं तर आश्चर्य वाटेल ना. पण युएसमध्ये असा प्रकार घडला आहे.
आणखी वाचा - आयफोनच्या किंमतीएवढ्याच खर्चात परदेश दौरा शक्य आहे!
आणखी वाचा - बायकोसाठी ऑनलाइन ऑर्डर केला आयफोन 7, बॉक्समध्ये आली साबणाची वडी
इव्हिनिंग स्टॅंडर्डच्या वृत्तानुसार, युएसमधल्या विस्कॉन्सीन या शहरात एक माणूस ब्लॅक फ्रायडेची ऑफर देत होता. विस्कॉन्सीनमध्ये एका ट्रकमधून विविध वस्तू विकण्यात येत होत्या. त्याच्याकडे कपडे, चप्पल, घड्याळं, पर्सेस, डीव्हिडी, सीडी, मोबाईल आणि लॅपटॉप अशा वस्तू होत्या. प्रत्येक वस्तूवर ऑफर असल्याने या महिलेने सगळ्या वस्तूंची पाहणी केली. त्यामध्ये आयफोन ६ ला २० टक्क्यांची सुट होती. १०० डॉलरचा आयफोन ६ तिला ८० डॉलरमध्ये मिळत होता. त्यामुळे हा आयफोन घेण्याचा निर्णय घेतला. हा मोबाईल व्यवस्थित आहे की नाही, ड्युप्लिकेट तर नाही ना, यात काही दोष तर नाही ना या सगळ्या गोष्टींची तिने खात्री करून घेतली. मोबाईल अगदीच व्यवस्थित होता. नवा कोरा होता. त्यामुळे ऑफरमध्ये जर मोबाईल मिळत असेल तर घ्यायला काय हरकत आहे, असा विचार करून तिने त्या मोबाईलचे ८० डॉलर भरले आणि मोबाईल पॅक्ड करायला सांगितलं.
आणखी वाचा - आयफोनच्या विक्रीमध्ये सलग तिसऱ्यांदा घट
घरी आल्यावर आरामात तिने मोबाईलचा बॉक्स उघडला. बॉक्स उघडताच तिला धक्का बसला. त्या बॉक्समध्ये आयफोन नव्हताच. त्यात होते बटाटे. ८० डॉलरचे बटाट्यांचे ११ काप त्यात होते. एवढंच नाहीतर त्या बॉक्समध्ये एक अॅण्ड्रॉइड मोबाईलचा चार्जरही देण्यात आला होता. हे म्हणजे जखमेवर मिठ चोळल्यासारखंच झालं. त्यामुळे ऑनलाईन वस्तू मागवल्यावर ज्याप्रमाणे बॉक्स उघडल्याशिवाय पैसे देत नाही, त्याचप्रमाणे रस्त्यावरही वस्तू खरेदी करताना आपल्या पिशवीत किंवा बॉक्समध्ये नक्की काय भरलं जातंय याचीही शहानिशा करावी लागणार आहे. नाहीतर तुम्हीही उद्या आयफोन घ्यायला जाल आणि हाती कांदे-बटाटे येतील.
तंत्रज्ञानासंबंधित आणखी बातम्यांसाठी येथे क्लिक करा.
सौजन्य - www.standard.co.uk