तीन फूट लांबीच्या सापाने महिलेची उडाली झोप
By admin | Published: March 15, 2017 12:48 AM2017-03-15T00:48:53+5:302017-03-15T00:48:53+5:30
टेनेसीतील चिथॅम काऊंटीत राहणाऱ्या ख्रिस्तीन हम्पश्रिज यांच्या अंथरुणात गुरुवारी रात्री तीन फूट लांबीचा साप निघाला. त्यांनी सांगितले की आधी मला कोचवरच झोप लागली होती.
टेनेसीतील चिथॅम काऊंटीत राहणाऱ्या ख्रिस्तीन हम्पश्रिज यांच्या अंथरुणात गुरुवारी रात्री तीन फूट लांबीचा साप निघाला. त्यांनी सांगितले की आधी मला कोचवरच झोप लागली होती. नंतर थोडी रात्र झाल्यावर मी बेडरूममध्ये झोपले. रात्री दोन वाजता मला जाग आली त्यावेळी मला असे वाटले की माझी मांजरच माझ्या हाताला स्पर्श करीत आहे. परंतु काही क्षणांतच मला झालेला स्पर्श हा मांजरीच्या केसांचा नाही, असे हम्पश्रिज यांनी डब्ल्यूटीव्हीएफ-टीव्हीला सांगितले.
मी आणखी निरखून बघितले. हात न हलवता मी डोके वर केले. अंथरुणात जे काही होते त्याचे डोके लहान होते. मी बॅटरी घेतली व बघितले तेव्हा मांजर नसून तब्बल तीन फूट लांब साप होता. मी किंचाळून खालच्या खोलीत असलेल्या माझ्या मुलीला आवाज दिला. माझ्या घरी कधीही सापच काय पण उंदीरही निघालेला नसल्यामुळे मला खूपच धक्का बसला होता, असे हॅम्पश्रिज म्हणाल्या.
हा साप बिनविषारी होता व चिथॅम काऊंटीच्या महापौरांच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन जंगलात सोडले. हा साप बेसमेंटमध्ये आलेल्या पुराच्या पाण्यातून घरात आला असावा, असे हॅम्पश्रिज यांना वाटते. साप माझ्या अंथरुणात माझ्या अंगावर दिसताच मी भयंकर घाबरले. अशा अनैसर्गिक परिस्थितीत घाबरून जाणारी मी काही पहिलीच व्यक्ती नाही, असे ख्रिस्तीन हॅम्पश्रिज यांनी फेसबुकवर लिहिले.