‘सोशल’ सोडचिठ्ठीने घटलं ब्रेंडाचं वजन !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 08:20 AM2021-10-29T08:20:25+5:302021-10-29T08:20:51+5:30
Brenda Finn : नॉर्थ लंडन येथे राहाणाऱ्या ब्रेंडा फीन या महिलेला त्यामुळे उत्साह आला. सोशल मीडियाला सोडचिठ्ठी देताना योग्य आहार आणि फिटनेस रुटिनही तिनं सुरु केलं.
आजकाल जगात सगळीकडेच लोक ‘सोशल’ झाले आहेत. पूर्वी कधी नव्हते इतके लोक आजकाल एकमेकांना भेटतात, चर्चा करतात. ते भेटले नाही, तर त्यांना अस्वस्थ होतं. पण अर्थातच ते ‘सोशल’ झाले आहेत ते सोशल मीडियावर आणि त्यांची हजारो लोकांशी गाठभेट होते तीही आभासीच. भेटल्यासारखं, बोलल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात काहीच नाही..
याच सोशल मीडियानं जगात अनेक प्रश्न निर्माण करून ठेवले आहेत. अनेक जण अनेक आजारांना, व्यसनांना बळी पडताहेत. सोशल मीडिया हाच अनेकांचा आजार आणि व्यसनही आहे. त्यामुळे या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी आता धडपड सुरु झाली आहे.
सोशल मीडियाचा सर्वात मोठा परिणाम झाला आहे तो तरुणाईवर. त्यांची जीवनशैलीच बदलली आहे. खाली मान घालून ‘बसून’ राहण्याच्या या सवयीमुळे त्यांच्या वजनात आणि कंबरेच्या घेरातही मोठी वाढ होत आहे. त्यातून बाहेर पडणं अनेकांना विलक्षण कठीण झालं आहे.
इतकंच काय, डॉक्टरांचीही काही मात्रा चालेनाशी झाली आहे. त्यावर लंडनच्या एका महिलेने मात्र, एक अतिशय जालीम उपाय शोधला आहे आणि त्याचा तिला फार मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. इतकी वर्षं ती वजन कमी करण्याच्या प्रयत्नात होती पण, काही केल्या त्यात तिला यश येत नव्हतं. मात्र वर्षभरातच तिनं आपलं तब्बल ३१ किलो वजन कमी केलं आहे ! त्यासाठी तिनं ‘फार’ कष्टही घेतले नाहीत.असं तिनं केलं तरी काय आणि त्याचा इतका परिणाम झाला तरी कसा?
- काही नाही, तिनं फक्त सोशल मीडियाला रामराम ठोकला. फेसबुक, इन्स्टाग्राम.. ही अकाऊंट्स तिनं डिलिट केली आणि लगेच परिणाम दिसायला सुरुवात झाली. काही दिवसांतच तिला जाणवायला लागलं, आपलं वजन थोडं कमी झालंय, कंबरेचा घेर थोडा आक्रसलाय, आपले कपडे आपल्याला थोडे ढिले व्हायला लागलेत..
नॉर्थ लंडन येथे राहाणाऱ्या ब्रेंडा फीन या महिलेला त्यामुळे उत्साह आला. सोशल मीडियाला सोडचिठ्ठी देताना योग्य आहार आणि फिटनेस रुटिनही तिनं सुरु केलं. ब्रेंडाचं म्हणणं आहे, वजन घटवण्यासाठी कोणताही अतिरेक मी केला नाही. जीममध्ये, ग्राऊंडवर जाऊन अतोनात घाम गाळला नाही की, जेवण बंद केलं नाही. जो आणि जेवढा वेळ मी सोशल मीडियावर घालवत होते, तो वेळ सार्थकी लावायला सुरुवात केली. वेळ मिळाला की, मी स्वयंपाकात वेगवेगळे पदार्थ बनवायला लागले. चांगले आरोग्यदायी पदार्थ खाऊ लागले. मी आता अतिशय फिट आहे आणि मला आता स्वत:ची लाज वाटत नाही..
आपलं वजन कमी व्हावं आणि शरीराची होत असलेली आडवी वाढ थांबावी यासाठी ब्रेंडानं गेली अनेक वर्षे प्रयत्न केले. अनेक प्रकारच्या डाएटिंगचा आधार घेतला पण, काहीच फरक पडला नाही. ब्रेंडा म्हणते, मी लहानपणापासूनच ‘चबी’, गुटगुटीत आणि ‘गोंडस’ होते. मोठी झाले, तरी त्यात फारसा फरक पडला नाही. २०१६ ते २०१९ या काळात तर, सटरफटर, जंक फूड खाण्याचा मी सपाटाच लावला. नंतर लॉकडाऊनच्या काळात तर, त्यात आणखीच वाढ झाली. जे थोंडंफार हिंडणं-फिरणं होतं, तेही पूर्णत: बंद झालं. जंक फूडनं मला अधिकच गरगरीत केलं. हळूहळू माझं नैराश्य वाढत गेलं..”
सतत सोशल मीडियावर असल्यामुळे तिथं सल्ला देणारेही कमी नव्हते. कोणी वेगवेगळ्या पोस्ट्स टाकायचं, कोणी फोटो टाकायचं, अमूक कर, धमूक कर असे सल्ले द्यायचं, त्यामुळे तिच्या नैराश्यात वाढच होत गेली. आपल्याला काहीच जमणार नाही, असं वाटून शेवटी तिनं आपले सोशल मीडिया अकाऊंटच बंद केले.. वैतागून केलेली ही, कृती मात्र तिला फार फायद्याची ठरली. ‘आता काय करायचं?’, हा प्रश्न समोर आ वासून उभा ठाकल्यावर तिनं स्वत:ला कशा ना कशात गुंतवायला, काही क्रिएटिव्ह कामं करायला सुरुवात केली.
मर्यादित प्रमाणात जॉगिंग करायला, सकाळच्या प्रसन्न हवेत फिरायला सुरुवात केली. तिचं वजन आपोआप आटोक्यात यायला लागलं. चेहऱ्यावर तजेला दिसायला लागला. काही करण्याची ऊर्मी वाढली. त्यामुळे तिची लाइफस्टाईलही आपोआप आरोग्यदायी होत गेली. ब्रेंडाचं म्हणणं आहे, सोशल मीडियाला मी माझ्या आयुष्यातून हद्दपार केलं नसतं तर, हे कधीच शक्य झालं नसतं. सुरुवातीला त्यापासून दूर राहाणं मला जड गेलं, पण, ते अशक्य नाही, हेही मला समजलं.
ब्रेंडाच्या पावलावर अनेकांचं पाऊल!..
ब्रेंडाचं म्हणणं आहे, सोशल मीडिया तुमच्या आयुष्यात आलं की, जंक फूडही आपोआप तुमच्या आयुष्यात येतं. या दोन्ही गोष्टींना तुम्ही बळी पडत जाता आणि तुमच्या आयुष्याचीच वाट लागते. ब्रेंडाच्या उदाहरणानं ब्रिटनमधील अनेक जणांना प्रेरणा दिली आहे. सोशल मीडियापासून शक्य तितकं दूर होण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. ‘सोशल मीडिया हे व्यसन आहे, हे आम्हाला माहीत होतं पण, त्यातून सुटताही येत याची आम्हाला कल्पना नव्हती’, ब्रेंडानं ते आम्हाला दाखवून दिलं आहे, असं म्हणत अनेकांनी ब्रेंडाचं अभिनंदन केलं आहे.