व्हायचं होतं ‘बार्बी डॉल’, पण झालं भलतंच!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 08:57 AM2022-05-06T08:57:15+5:302022-05-06T09:03:26+5:30
आपण छान दिसावं असं कोणाला वाटत नाही? प्रत्येक जण त्यासाठी आसुसलेला असतो आणि आपापल्या परीनं काही ना काही प्रयत्न करीत असतो.
आपण छान दिसावं असं कोणाला वाटत नाही? प्रत्येक जण त्यासाठी आसुसलेला असतो आणि आपापल्या परीनं काही ना काही प्रयत्न करीत असतो. सुंदर दिसण्यासाठी महिलांचे त्यासाठीचे प्रयत्न तर वादातीत. सुंदर दिसण्यासाठी ज्या काही, जिथून कुठून टिप्स त्यांना मिळतील, त्या करून पाहण्याचा बऱ्याच स्त्रियांचा आणि तरुणींचा कल असतो. आपण सुंदर दिसावं यासाठी अमेरिकेच्या लॉस ऐंजेल्स येथील विनी ओह या एका तरुणीने तर स्वत:वर शंभरपेक्षा जास्त शस्त्रक्रिया करवून घेतल्या होत्या. त्यासाठी लाखो डॉलर्सही तिनं खर्च केले होते. ‘एलियनसारखं दिसणं’ हा तिच्यादृष्टीनं सौंदर्याचा सर्वोच्च मापदंड होता. यासंदर्भातला मजकूर याच सदरात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला होता.
ऑस्ट्रियातील अशाच एका तरुणीनं, आपण आहोत त्यापेक्षा अधिक सुंदर दिसण्यासाठी स्वत:वर अनेक शस्त्रक्रिया करवून घेतल्या. आपण ‘बार्बी डॉल’सारखं दिसावं हे तिचं स्वप्न. त्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून ती प्रयत्न करते आहे. त्यासाठी काहीही करण्याची तिची तयारी आहे. तिनं केलेल्या शस्त्रक्रिया आणि त्यासंदर्भात तिनं सोशल मीडियावर वेळोवेळी शेअर केलेले स्वत:चे फोटो यामुळे सध्या ती फार चर्चेत आहे. २१ वर्षीय या तरुणीचं नाव आहे जेसिका, पण जेसी बनी या नावानं ती सोशल मीडिया आणि इतरत्र प्रसिद्ध आहे. आपली छाती, पार्श्वभाग आणि ओठ मोठे दिसावेत यासाठी तिनं या शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यासाठी आतापर्यंत ५५ हजार पाऊंड्सपेक्षा जास्त (सुमारे ५३ लाख रुपये) तिनं खर्च केले आहेत. अर्थातच तिच्या या शस्त्रक्रिया अजून थांबलेल्या नाहीत. आणखी अनेक शस्त्रक्रिया तिला करायच्या आहेत.
‘बार्बी डॉल’ बनण्यासाठी आतापर्यंत तिनं स्वत:चं जे काही ‘ध्यान’ करून घेतलं आहे, त्यामुळे सोशल मीडियावर तिची खिल्ली आणि टिंगल-टवाळीच केली जातेय, पण तिला त्याची फिकीर नाही. तिच्यामते, लोकांना सौंदर्यांची व्याख्याच अजून कळलेली नाही. मी जेव्हा ‘परफेक्ट’ होईन, तेव्हा लोकांना सौंदर्य म्हणजे काय असतं, ते कळेल!
आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुंदर दिसावं म्हणून ती जे काही करते आहे, ते तिच्या कुटुंबालाही पसंत नाही. त्यांच्यादृष्टीनं जेसीचे हे ‘येडेचाळे’ सुरू आहेत. तिचं मूळचं सौंदर्य ती गमावून बसली आहे आणि सुंदर दिसण्याऐवजी तिनं स्वत:चं ‘भूत’ करून घेतलं आहे. जेसीच्या घरच्यांनी तिला बऱ्याच वेळा समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती जेव्हा ऐकण्याच्या पलीकडे गेली, तेव्हा त्यांनी तिच्याशी सारे संबंध तोडून टाकले. त्यांच्यादृष्टीनं ती आपल्या कुटुंबाची घटक नाहीच. विशेष म्हणजे जेसीनं स्वत:च ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली. त्याबद्दल तिनं खेदही व्यक्त केला. जेसी म्हणते, माझं माझ्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. विशेषत: माझा भाऊ आणि माझे आजोबा यांच्याशिवाय जगणं मला फार कठीण जातं आहे. त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी गप्पागोष्टी करणं, हा माझ्या आयुष्यातील आनंदाचा मोठा ठेवा होता, पण त्या ठेव्याला आता मी मुकले आहे. मी त्यांना अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मेसेज केले, पण कोणाचाही, एकही रिप्लाय मला अजून आलेला नाही. त्यांनी माझा नंबरच ब्लॉक करून टाकला आहे. मला त्यांच्या संपर्कात राहायचं आहे, पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे माझे सारे मार्गच त्यांनी बंद करून टाकले आहेत. हे दु:ख पचवणं माझ्यासाठी खरंच अवघड आहे.
आपण बार्बी डॉलसारखं दिसावं हे जेसीचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं, पण त्यादृष्टीनं मनापासून प्रयत्न तिनं सुरू केले, ते वयाच्या सोळाव्या वर्षापासून आणि अठराव्या वर्षापासून तर ती शस्त्रक्रियांच्याच मागे लागली. अठराव्या वर्षीच छातीवर तिनं तीन वेळा मोठ्या शस्त्रक्रिया करवून घेतल्या आहेत. आपला पार्श्वभाग आणि ओठांवरही तिनं अनेक कॉस्मेटिक सर्जरीज केल्या आहेत. प्रत्येक शस्त्रक्रियेनंतर आपल्यात झालेल्या ‘ट्रान्स्फॉर्मेशन’चे फोटो आणि व्हिडिओ तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि जवळपास प्रत्येकवेळी युजर्सकडून तिला टोमणे ऐकावे लागले आहेत.
माध्यमांशी बोलताना जेसीनं सांगितलं, देशातील (ऑस्ट्रिया) सर्वात कमनीय महिला म्हणूनच नव्हे, तर सर्वांत मोठे ओठ असलेली महिला असल्याचा सन्मान मला मिळवायचा आहे. त्यासाठी अजूनही काही शस्त्रक्रिया मला करायच्या आहेत आणि लवकरच मी त्या करीन. जेसीच्या या हट्टापायी केवळ तिच्या आई-वडिलांनीच नव्हे, तर तिच्या मित्र-मैत्रिणींनीही तिच्यापासून नातं तोडलं आहे. अनेकांनी तिला भेटणं, तिच्याशी बोलणं बंद केलं आहे. सोशल मीडिया युजर्ससाठी तर जेसी म्हणजे हक्काचं विनोदाचं ठिकाण बनलं आहे.
शिक्षणाच्या पैशातून शस्त्रक्रिया!
शस्त्रक्रिया करवून घेण्याच्या आधी जेसीचे केस काळे होते आणि आपल्या शरीरावर अनेक ठिकाणी तिनं ‘टोचून’ही घेतलं होतं. तिच्या आई-वडिलांनी तिला ड्रायव्हिंग शिकण्यासाठी पैसे दिले होते. तेव्हा त्या पैशांचा उपयोग ड्रायव्हिंग शिकण्यासाठी न करता तिनं स्वत:वर शस्त्रक्रिया करवून घेतली होती. ही तिची पहिली शस्त्रक्रिया. नंतर त्यात वाढच होत गेली.