महिलेचा कोरोना रिपोर्ट १० वेळा आला निगेटिव्ह, मृत्युनंतर समोर आलेलं कारण ऐकून परिवाराला धक्का....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 12:28 PM2021-05-04T12:28:07+5:302021-05-04T12:28:51+5:30
Coronavirus News : महिलेचं हर्नियाचं ऑपरेशन करण्यात आलं आणि तिला १० दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं. या दहा दिवसात दररोज तिची कोरोना चाचणीही करण्यात आली.
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. जगातली इतर देशातही कोरोनाचा (Coronavirus) हैदोस सुरूच आहे. अशात कोरोनासंबंधी वेगवेगळ्या विचित्र बातम्याही समोर येत आहेत. अशात ब्रिटनमधून एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. एका ५५ वर्षीय महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
महिलेचं हर्नियाचं ऑपरेशन करण्यात आलं आणि तिला १० दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं. या दहा दिवसात दररोज तिची कोरोना चाचणीही करण्यात आली. महिलेचा दररोजचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र तरीही दहा दिवसांनंतर तिचा मृत्यू (Woman Tests Positive for Covid 19 After Death) झाला. धक्कादायक बाब म्हणजे यानंतर हॉस्पिटलनं महिलेला कोरोना असल्याचं सांगितल्याचं तिच्या मुलानं म्हटलं आहे.
ब्रिटनमधील स्टॅनफोर्डशायरतील ही घटना असून इथल्या रॉयल स्टोक युनिव्हर्सिटीच्या रुग्णालयात डेबरा शॉ नावाची महिला भरती झाली होती. ऑपरेशन सक्सेसफुल झाल्यावर या महिलेचा दहा दिवसांनंतर रुग्णालयात मृत्यू झाला. मृत्युनंतर तिच्या नातेवाईकांना बोलावलं गेलं. यावेळी हॉस्पिटलकडून त्यांना सांगण्यात आलं की, महिलेला कोरोना नव्हता. मात्र, रुग्णालयातच रिकव्हरीदरम्यान तिला निमोनिया झाला. मात्र, आता प्रकरण वेगळ्याच दिशेनं फिरलं.
द सन डॉट यूकेच्या वृत्तानुसार, मृत डेबरा शॉ या महिलेच्या ३२ वर्षीय मुलाने सांगितलं की, तिचे कोरोना रिपोर्ट आधी निगेटिव्ह आले होते. नंतर आम्हाला हे सांगण्यात आलं की माझी आई कोरोना पॉझिटिव्ह होती. हे पूर्णपणे चुकीचं आहे. जर ती कोरोनाबाधित होती, तर सलग दहा दिवस तिचा अहवाल निगेटिव्ह कसा आला? आणि जर ती खरंच पॉझिटिव्ह होती, तर संपूर्ण कुटुंबाला तिच्याजवळ घेऊन जात, सगळ्यांचा जीव धोक्यात का घातला? आता महिलेचे कुटुंबिय रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल करण्याच्या विचारात आहेत.