Corona Vaccine : तरुणीने कोरोनाची लस घेतली अन् 7.4 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 01:02 PM2021-11-08T13:02:02+5:302021-11-08T13:03:35+5:30
Corona Vaccine : कोविड महामारीशी लढण्यासाठी जगातील प्रत्येक देश आपल्या नागरिकांना कोरोनाची लस घेण्याबाबत जागरूक करत आहे. यासाठी लोकांना सातत्याने प्रोत्साहन दिले जात असून त्यांना आकर्षक बक्षिसेही दिली जात आहेत.
कोविड-19 महामारी टाळण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. जवळपास प्रत्येक देशाचे सरकार आपल्या नागरिकांना लसीकरणाबाबत संदेश देत आहे आणि त्यांना विविध मार्गांनी जागरूक देखील करत आहे. दरम्यान, ही बातमी तुम्हाला लसीकरणासाठी प्रेरित करू शकते. खरंतर, जेव्हा एका तरुणीला कोरोनाची लस देण्यात आली तेव्हा तिच्यावर पैशांचा पाऊस पडला. तिला एकूण 7.4 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. लसीकरण करून तरुणी कशी झाली करोडपती आणि कोणत्या देशात घडली ही घटना? जाणून घ्या...
कोविड महामारीशी लढण्यासाठी जगातील प्रत्येक देश आपल्या नागरिकांना कोरोनाची लस घेण्याबाबत जागरूक करत आहे. यासाठी लोकांना सातत्याने प्रोत्साहन दिले जात असून त्यांना आकर्षक बक्षिसेही दिली जात आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी अनेक देशांच्या सरकारांनी महत्त्वाची पावले उचलली आहेत. दरम्यान, सर्व वयोगटातील काही लोक आहेत, जे अजूनही कोरोनाची लस घेण्यास संकोच करत आहेत. अशा परिस्थितीत लोकांना मोफत खेळाची तिकिटे, दारू, खाद्यपदार्थ आणि लॉटरीची तिकिटे अशा ऑफर्सही दिल्या जात आहेत. अशा ऑफरमध्ये लसीकरण करून ऑस्ट्रेलियातील एक तरुणी करोडपती झाली.
तरुणी अशी जिंकली लॉटरी
मिळालेल्या माहितीनुसार, लसीकरण मोहिमेत ऑस्ट्रेलिया सरकारने द मिलियन डॉलर वॅक्स अलायन्स लॉटरी सिस्टम सुरू केली, ज्यामध्ये जोआन झू नावाच्या मुलीने 10 लाख डॉलर्सची लॉटरी जिंकली, जी भारतीय चलनात सुमारे 7.4 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. जोआन झू ही लाखो ऑस्ट्रेलियन लोकांपैकी एक आहे, ज्यांना सरकारच्या विनंतीवरून कोरोनाची लस मिळाली आणि लकी ड्रॉमध्ये ती करोडपती बनली आहे.
कंपन्यांनी गोळा केले होते पैसे
जोआन झू हिला मिळालेल्या बक्षिसासाठी ऑस्ट्रेलियन समाजसेवी आणि कंपन्यांच्या एका गटाने पैसे उभे केले होते. लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मोठ्या बक्षीस रकमेची घोषणा करण्यात आली होती, त्यानंतर द मिलियन डॉलर वॅक्स अलायन्सच्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला.
30 लाख लोक लकी ड्रॉमध्ये सहभागी
मिळालेल्या माहितीनुसार, या लकी ड्रॉमध्ये जोआन झू हिच्यासह जवळपास 30 लाख लोकांनी भाग घेतला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जोआन झू हिला ग्रँड प्राईज जिंकण्याची कल्पना नव्हती. लॉटरी अधिकाऱ्यांनी तिला पहिल्यांदा बोलावले, तेव्हाही व्यस्त असल्यामुळे तिला समजले नाही.
जोआन असे करणार सर्व पैसे खर्च
लकी ड्रॉचा चेक मिळाल्यानंतर, जोआन झू ही कुटुंबासाठी भेटवस्तू खरेदी करण्याची आणि भविष्यासाठी गुंतवणूक करण्याची योजना सुरू करत आहे. ती म्हणाली की, जर चिनी नववर्षासाठी सीमा खुल्या झाल्या तर मला माझ्या कुटुंबासह प्रथम श्रेणीच्या तिकिटावर विमानाने प्रवास करायचा आहे आणि पंचतारांकित हॉटेल बुक करायचे आहे.