दोन वर्षांपासून घरातून येत होती दुर्गंधी; पोलीस टाळत राहिले, कुलूप फोडताच सारेच हादरले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 05:01 PM2022-02-21T17:01:06+5:302022-02-21T17:03:43+5:30
दोन वर्षांपासून पोलिसांनी केलेली टाळाटाळ महागात पडली; दरवाज्याचं कुलूप फोडताच धक्कादायक प्रकार समोर
लंडन: पोलिसांच्या अकार्यक्षमतेचं किस्से अनेकदा पाहायला मिळतात. लंडनच्या पोलिसांच्या बाबतीत घडलेला किस्सा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यामुळे पोलिसांवर टीका होत आहे. एका इमारतीत वास्तव्यास असलेले रहिवासी गेल्या २ वर्षांपासून दुर्गंधीनं त्रस्त होते. एका घरातून येत असलेल्या दुर्गंधीची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली. वारंवार तक्रार करूनही पोलिसांनी दुर्लक्ष केलं. अखेर २ वर्षांनी घराचा दरवाजा तोडण्यात आला आणि घरातील दृश्य पाहून साऱ्यांनाच धक्का बसला.
'द सन'नं दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण लंडनमधील पेखम येथे असलेल्या एका इमारतीमधील रहिवासी दुर्गंधीला वैतागले होते. बंद असलेल्या घरातून येत असलेल्या दुर्गंधीमुळे सगळ्यांनाच त्रास व्हायचा. ऑक्टोबर २०१९ मध्ये सोसायटीनं याची तक्रार पोलिसांना केली. मात्र काहीच झालं नाही. पोलीस इमारतीत येऊन गेले. महिला महामारीमुळे लंडनच्या बाहेर गेली असावी, असं सांगून पोलीस निघून गेले. बंद असलेलं घर ६१ वर्षीय महिलेचं होतं.
इमारतीत वास्तव्यास असलेल्या रहिवाशांनी नुकतीच पोलिसांकडे पुन्हा तक्रार केली. तेव्हा पोलिसांनी कुलूप तोडण्याचा निर्णय घेतला. पोलीस अधिकारी आत शिरताच त्यांना मोठा धक्का बसला. पोलिसांना फ्लॅटमध्ये महिलेचा मृतदेह सापडला. त्याचं रुपांतर सापळ्यात झालं होतं. 'सप्टेंबर २०१९ मध्ये मी परदेशातून परतले तेव्हाच मला घरातून दुर्गंधी येत होती. आम्ही नाकाला रुमाल लावून बाहेर पडायचो. याबद्दल पोलिसांना माहिती दिली. पण काहीच झालं नाही,' असं शेजारील महिलेनं सांगितलं.
वायू गळतीमुळे दुर्गंध येत असल्याचं शेजाऱ्यांना सुरुवातीला वाटलं. मात्र दुर्गंधी कमी होत नसल्यानं रहिवासी चिंतेत पडले. मृत महिलेच्या घराबाहेरील पत्राची पेटी भरली होती. तिच्या दरवाज्यात एक सायकलही उभी होती. महिलेचं काहीतरी बरं वाईट झाल्याचा संशय शेजाऱ्यांना होता. पण पोलिसांनी त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं. कोरोना संकट असल्यानं महिला शहराबाहेर गेली असावी, असं म्हणत पोलीस तक्रारींकडे दुर्लक्ष करत राहिले.