‘महिलांना सर्वकाही मिळू शकत नाही’
By admin | Published: July 4, 2014 05:27 AM2014-07-04T05:27:34+5:302014-07-04T05:27:34+5:30
कोलोरॅडोतील अॅस्पेन आयडियाड फेस्टीवलमध्ये नूयी यांनी मनमोकळा संवाद साधला. त्या म्हणाल्या, महिला सर्व काही मिळवू शकतात, असे मला वाटत नाही
न्यूयॉर्क : घर आणि आॅफिस या दोन्ही विश्वाचा आनंद महिलांना मिळू शकत नाही, असे जगातील सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक ‘पेप्सीको’च्या भारतीय वंशाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदिरा नूयी यांनी म्हटले आहे. कार्यालयातील कामकाज आणि घरातील कौटुंबिक जीवन याचा ताळमेळ घालणे कठीण बनल्याचे त्यांनी मान्य केले. माझी मुलगी मला चांगली आई मानत असेल याबाबत मला शंका असल्याचेही त्या म्हणाल्या.
कोलोरॅडोतील अॅस्पेन आयडियाड फेस्टीवलमध्ये नूयी यांनी मनमोकळा संवाद साधला. त्या म्हणाल्या, महिला सर्व काही मिळवू शकतात, असे मला वाटत नाही. आम्ही सर्वकाही मिळवू शकतो, असा केवळ आम्ही दावा करतो. फोर्ब्ज आणि इतर प्रकाशनांच्या जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये सातत्याने स्थान पटकावणाऱ्या नूयी म्हणाल्या की, पतीसह दोन मुलींचे पालनपोषण करण्यात मला अनेकदा अपराधीपणाच्या भावनेला सामोरे जावे लागले. मी सुटी घेऊ शकत नव्हते. त्यामुळे मला मुलींच्या शाळेतील कार्यक्रमात सहभागी होता येऊ शकत नव्हते. हे मला अनेकदा बोचलेले आहे. (वृत्तसंस्था)