तालिबानचे अजब 'फर्मान', आता महिलांकडून 'हे' अधिकार हिरावून घेतले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 05:16 PM2022-03-28T17:16:19+5:302022-03-28T17:17:11+5:30

Taliban Order : अफगाणिस्तानच्या एरियाना अफगाण एअरलाइन आणि काम एअरच्या दोन अधिकाऱ्यांनी रविवारी उशिरा सांगितले की, तालिबानने त्यांना महिलांना पुरुष नातेवाईकाशिवाय प्रवास करू न देण्याचे आदेश दिले आहेत.

Women Can't Fly Without Male Relative: Officials Claim Taliban Order | तालिबानचे अजब 'फर्मान', आता महिलांकडून 'हे' अधिकार हिरावून घेतले

तालिबानचे अजब 'फर्मान', आता महिलांकडून 'हे' अधिकार हिरावून घेतले

Next

काबूल : अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून तालिबानने महिलांसाठी अनेक तुघलकी आदेश जारी केले आहेत. आता तालिबानने महिलांचे विमान प्रवासाचे स्वातंत्र्यही हिरावून घेतले आहे. अफगाणिस्तानमधील विमान कंपन्यांना महिलांना पुरुष नातेवाईक असतील तरच विमानात बसण्याची परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानच्या एरियाना अफगाण एअरलाइन आणि काम एअरच्या दोन अधिकाऱ्यांनी रविवारी उशिरा सांगितले की, तालिबानने त्यांना महिलांना पुरुष नातेवाईकाशिवाय प्रवास करू न देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर एएफपीला सांगितले की, तालिबानचे प्रतिनिधी, दोन विमान कंपन्या आणि विमानतळ इमिग्रेशन अधिकारी यांच्यात गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

तालिबान सत्तेवर आल्यानंतर महिलांच्या स्वातंत्र्यावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. या निर्णयाबाबत अफगाणिस्तानच्या संबंधित मंत्रालयाला विचारले असता त्यांनी सांगितले की, महिलांना एकट्याने विमान प्रवास करण्यास बंदी घालणारे कोणतेही निर्देश जारी केलेले नाहीत. त्याच वेळी, तालिबानशी झालेल्या बैठकीनंतर, एरियाना अफगाणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने या आदेशाबद्दल एअरलाइनच्या कर्मचाऱ्यांना पत्र जारी केले. 

एएफपीने तालिबानच्या या पत्राचा हवाला देत तालिबानच्या आदेशाला दुजोरा दिला आहे. "कोणत्याही महिलेला पुरुष नातेवाईकाशिवाय कोणत्याही देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये प्रवास करण्याची परवानगी नाही," असे पत्रात म्हटले आहे. एएफपीच्या म्हणण्यानुसार, दोन ट्रॅव्हल एजंटांनी देखील पुष्टी केली की त्यांनी एकल महिला प्रवाशांना तिकीट देणे बंद केले आहे.

महिलांना विमानात चढण्याची परवानगी नव्हती
"काही महिला ज्या पुरुष नातेवाईकाशिवाय प्रवास करत होत्या त्यांना शुक्रवारी काबुल-इस्लामाबाद काम एअर फ्लाइटमध्ये चढण्याची परवानगी नव्हती", असे फ्लाइटमधील एका प्रवाशाने एएफपीला सांगितले. तर आणखी एका सूत्राने सांगितले की, अमेरिकेचा पासपोर्ट असलेल्या अफगाण महिलेला शुक्रवारी दुबईला जाण्यासाठी विमानात बसण्याची परवानगी नाकारण्यात आली. दरम्यान, तालिबानमधील महिलांना बहुतांश सरकारी नोकऱ्या आणि माध्यमिक शालेय शिक्षणातून बाहेर करण्यात आले आहे. यासोबतच कुराणच्या काटेकोर व्याख्येनुसार कपडे घालण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: Women Can't Fly Without Male Relative: Officials Claim Taliban Order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.