कोविड-१९ साथीनंतरही सुरू राहणार वर्क फ्रॉम होम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 02:40 AM2020-09-25T02:40:13+5:302020-09-25T02:40:37+5:30
बिल गेट्स यांचे प्रतिपादन : कार्यालयांवरील खर्चात होणार बचत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘वर्क फ्रॉम होम’ संस्कृतीने चांगले काम केले असून, कोविड-१९ महामारीनंतरही अनेक कंपन्या ही नवी कार्यपद्धती सुरूच ठेवतील, असे प्रतिपादन मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि दानशूर अब्जाधीश बिल गेट्स यांनी केले आहे.
जगभरात कोविड-१९ महामारीने थैमान घातल्यामुळे कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा द्यावी लागली आहे. आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांत मोठ्या प्रमाणात ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे.
एका आॅनलाइन व्यवसाय शिखर परिषदेत गेट्स यांनी सांगितले की, वर्क फ्रॉम होम संस्कृतीने केलेले उत्तम काम पाहणे हे चकित करणारे आहे. साथ संपल्यानंतरही ही कार्यपद्धती सुरू राहील. साथ संपल्यानंतर आपल्याला हे ठरवावे लागेल की, आपण कार्यालयात किती वेळ खर्च करायचा? बिल अॅण्ड मेलिंदा गेट्स फाउण्डेशनचे सहसंस्थापक असलेल्या बिल गेट्स यांनी सांगितले की, या संपूर्ण वर्षात मला खूप काही करायला वेळ मिळाला.
महिलांसाठी ठरते आहे अवघड बाब
गेट्स यांनी सांगितले की, सॉफ्टवेअर इंजिनिअरांनी घरून चांगले काम केले असले, तरी घरून काम करणे खरोखरच अवघड आहे. एक तर घर छोटे असते. शिवाय मुले असतात. घरातील कामही असतेच. महिलांसाठी ते आणखी अवघड असते. कारण त्यांना घरी अनेक गोष्टी सांभाळाव्या लागत असतात. ही वर्क फ्रॉम होममधील एक उणी बाजू आहे.