गावाकडे परतणाऱ्या मजुरांमुळे जास्त संसर्ग होण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 01:31 AM2020-04-15T01:31:28+5:302020-04-15T01:31:36+5:30
जागतिक बँकेचा भारताला इशारा; सावध राहाण्याची सूचना
वॉशिंग्टन : भारतात लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकून पडलेले हजारो मजूर मिळेल त्या वाहनाने किंवा प्रसंगी पायी चालत आपले गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. जिथे अद्याप कोरोनाची लागण झालेली नाही, अशा गाव व शहरांतही या मजुरांमुळे संसर्ग फैलावण्याची भीती जागतिक बंँकेने वर्तविली आहे.
जागतिक बँकेने यासंदर्भातील एका अहवालात म्हटले आहे की, जगातील घनदाट लोकसंख्या असलेल्या प्रदेशांमध्ये दक्षिण आशियातील देशांचा समावेश होतो. भारत, पाकिस्तान, बांगलादेशमध्ये एक दिवसाचीही आगाऊ सूचना न देता सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक पूर्णपणे स्थगित करण्यात आली. त्यामुळे नोकरी-व्यवसायासाठी स्थलांतर करून दुसºया प्रदेशात गेलेल्या लोकांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या. ते लोक मिळेल त्या वाहनाने, मार्गाने आपल्या गावी परतत आहेत. सोशल डिस्टन्सिंग राखणेही कठीण बनले आहे. या देशांतील झोपडपट्ट्यांमध्येही कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्यामुळे भारताने अतिशय सावध राहिले पाहिजे.
जागतिक बँकेने म्हटले आहे की, अमेरिका, चीनमधील ६५ वर्षे वय असलेल्या किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांची जितकी संख्या आहे, त्यापेक्षा दक्षिण आशियाई देशांत अशा प्रकारच्या नागरिकांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे कोरोनामुळे होणाºया मृत्यूचे प्रमाण दक्षिण आशियाई देशांमध्ये तुलनेने कमी असेल. (वृत्तसंस्था)
मजुरांना तातडीने मदत करा
जागतिक बँकेने म्हटले आहे की, रोज तळहातावर पोट घेऊन जगणाºया मजुरांची रोजंदारी लॉकडाऊनमुळे बुडाली. शहरात विनाकामधंदा व अर्धपोटी राहाण्याऐवजी शेकडो मैलाचा प्रवास करून गावाकडे परतण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. अशा मजुरांना सरकारने तातडीने मदत करून त्यांना आहे त्या ठिकाणी थांबविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.