Pakistan Economy Crisis: “वेळ पडल्यास गवत खाऊ, उपाशी झोपू,” असं एकेकाळी भुट्टो म्हणालेले; आज त्याच स्थितीत पोहोचलाय पाकिस्तान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 08:26 AM2023-01-12T08:26:43+5:302023-01-12T08:27:01+5:30
पाकिस्तानमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट उभे राहिले आहे.
पाकिस्तानचे चौथे राष्ट्रपती आणि सातवे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांना देशाच्या आण्विक कार्यक्रमाचे जनक म्हटले जाते. भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे अडचणीत आलेले झुल्फिकार भुट्टो अण्वस्त्रे मिळवण्यासाठी इतके उत्सुक होते की त्यांनी देशवासीयांना गवत खाण्यापर्यंतचा सल्लाही दिला होता. आज भुट्टो यांचे विधान खरे ठरताना दिसत आहे. देशाकडे अण्वस्त्रे आहेत पण गव्हाच्या पिठासाठी दारोदार भटकावे लागत आहे. पाकिस्तानचे येणारे दिवस खूप कठीण जाणार असल्याचेही दिसतेय. देशाकडे केवळ तीन आठवड्यांचा परकीय चलन साठा शिल्लक आहे आणि हा देश आता आर्थिक डबघाईकडे चाललाय.
पाकिस्तानातील गहू आणि पिठाच्या संकटावर बोलण्यापूर्वी भुट्टो यांच्या विधानाची आठवण करून घेऊ. १९७० मध्ये भुट्टो यांनी एका वक्तव्यात आण्विक कार्यक्रमाबाबत अस्वस्थता व्यक्त केली होती. ‘वेळ पडल्यास पाकिस्तानी गवत खातील, उपाशी राहतील पण अणुबॉम्ब नक्की मिळवतील,’ असे भुट्टो म्हणाले होते. भुट्टो यांचे विधान आज खरे ठरताना दिसत आहे. जून 2022 मध्ये इंटनॅशनल कँपेन टू एबॉलिश न्युक्लिअर वेपन्सचा रिपोर्ट समोर आला. यामध्ये पाकिस्ताननं अण्वस्त्रांवर 1.1 अब्ज डॉलर्सची रक्कम खर्च केल्याचे म्हटले होते.
आर्थिक स्थिती बिकट
पाकिस्तानचे शाहबाज शरीफ सरकार देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न करत असले तरी पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी घट झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानातील वृत्तपत्र डॉनमधील वृत्तानुसार 30 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचा (SBP) परकीय चलन साठा 5.576 अब्ज डॉलरच्या आठ वर्षांच्या नीचांकी पातळीवर आला. पाकिस्तान प्रचंड विदेशी कर्जात बुडाला आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने 245 अब्ज डॉलर्सच्या परकीय कर्जाची परतफेड केली आणि त्यामुळे परकीय चलन साठ्यात मोठी घट झाली. परकीय कर्जाची परतफेड करणे हे पाकिस्तानातील पीएमएलएनच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारसमोर सध्याचे सर्वात मोठे आर्थिक आव्हान आहे.
पीठासाठी लढाई
पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत खालावली आहे. महागाई इतकी वाढलीय की भारतात ५ रुपयांना मिळणारे पार्लेजी बिस्कीट पाकिस्तानात ५० रुपयांना विकले जात आहे. आपल्या देशात ४०-५० रुपयांना मिळणारे ब्रेडचे पाकिट पाकिस्तानमध्ये १५०-२०० रुपयांना विकले जात आहे. मूठभर पीठासाठी लढाई सुरू आहे. शिवाय पिठाच्या गोण्यांच्या सुरक्षेसाठी एके-४७ असलेले सैनिक तैनात आहेत.