जागतिक शांतता, तिथे मानवतेची सत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 04:24 AM2018-09-20T04:24:01+5:302018-09-20T04:24:23+5:30
देशोदेशी अंतर्गत होणारी देवाण घेवाण ही सुरूच राहणार असल्याने, शांततामय संबंध प्रस्थापित होणे गरजेचे आहे.
- दाजी कोळेकर
इंटरनेटचे जाळे, खुले आर्थिक धोरण (उदारीकरण, खासगीकरण व जागतिकीकरण) आणि स्मार्ट फोन यामुळे ‘जग एक खेडे’ बनले आहे. आपल्या देशात एके काळी खेडी स्वयंपूर्ण होती; पण हे जगरूपी खेडे स्वयंपूर्ण होणार नाही. देशोदेशी अंतर्गत होणारी देवाण घेवाण ही सुरूच राहणार असल्याने, शांततामय संबंध प्रस्थापित होणे गरजेचे आहे. म्हणून २१ सप्टेंबर हा जागतिक शांतता दिन साजरा करण्यात सुरुवात झाली आहे. उद्या जगभर हा दिवस साजरा होईल; पण शांततेचे काय? याबाबत थोडेसे...
मानवी जीवन समृद्ध होण्यासाठी शांतता अत्यंत महत्त्वाची बाब आहे; पण जगभराचा विचार करता धर्म आणि वर्चस्ववाद यामुळे संकटांना सामोरे जावे लागले. परिणामी, जागतिक अशांतता निर्माण झाली. त्यातील एक भाग म्हणजे आजपर्यंत जगाने पाहिलेली दोन जागतिक महायुद्धे. या दोन युद्धांमुळे जगातील अनेक राष्टÑांचे अपरिमित नुकसान झाले. तरीही जग तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज असल्याचे दिसतेय, मग तेलापायी वा पाण्यापायी. अशा स्थितीत जागतिक शांतता दिन ही साजरा होतोय. हा एक चांगला संदेश असून, एक शांततामय जीवनाच्या आशेचा किरण म्हणावा लागेल.
जागतिक शांतता धोक्यात आणण्यामध्ये आतंकवाद हा मोठा घटक असून, त्याची झळ अनेक देशांना बसली आहे व बसत आहे. काही राष्टÑांना तर आतंकवादी राष्टÑे म्हणून घोषित करण्याची मागणी होत आहे. यावरून आंतकवादाचे रूप किती भयानक आहे हे दिसून येते. आंतकवाद ही एक जागतिक समस्या असून, त्यामुळे जागतिक शांतता धोक्यात येत असते. जगातील अनेक राष्टÑे आतंकवादाने पोखरून निघाली आहेत.
आपल्या देशात आतंकवादाने कहरच केला आहे. नेहमी कुठे ना कुठे कारवाया होत असतात. जगाचे लक्ष असलेल्या काश्मीरच्या वादामुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे. आपल्या शेजारील देश शेजारधर्म पाळत नसल्याने आपली संरक्षण यंत्रणा नेहमी सज्ज ठेवावी लागते. तसेच वेळोवेळी विविध चाचण्या आणि अणुशक्तीमधून आपली ताकद दाखवून द्यावी लागते. जगामध्ये आशिया खंड हा आतंकवादाचा अड्डा असल्याचे बोलले जाते. काही राष्टÑांनी अणुबॉम्ब तयार करून जागतिक करार भंग केले आहेत.
खरे तर जागतिक शांतता ही एखाद्या राष्टÑातील काही घटनांवरून साधता येत नाही. त्यासाठी विश्वव्यापी पुढाकार घेतला पाहिजे. कारण मूलभूत व चिरंतन विकासातून मानवी कल्याण होण्यासाठी शांतता अत्यंत गरजेची आहे. त्यासाठी दोन मार्ग आहेत एक धाक आणि दुसरा अहिंसा; पण खरे तर यातील अहिंसेचा दुसरा मार्गच पत्करणे
काळाची गरज आहे.
जगाला शांततेचा संदेश देणाºया धर्माचे आचरण होणे गरजेचे आहे. अलीकडे मानवाच्या मूलभूत गरजा आणि भौतिक हव्यास वाढत चालला असून, वाढते लोकसंख्या व नागरीकरण यातून मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. परिणामी, माणूस आंतकवादाकडे वळू पाहत आहेत. त्यासाठी शांततेची गरज असून पहिले, दुसरे महायुद्ध झाले, आता तिसरे महायुद्ध नको. कारण, ते या खेडेरूपी जगाला परवडणारे नाही. नाहीतर हे खेडे अलीकडच्या शस्त्रसामुग्रीमुळे बेचिराख होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून जागतिक शांतता दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी मानवता हाच धर्म मानून जगाला शांततेचा संदेश दिला पाहिजे. म्हणून ज्या देशात शांतता नांदेल म्हणजे जगात शांतता नांदेल मानवतेची सत्ता येईल. म्हणजेच मानवी कल्याणला वाव मिळेल आणि सामाजिक स्वास्थ्य निर्माण होण्यास मदत होईल. म्हणून जिथे शांतता असेल तिथे मानवता आहे म्हणावे लागेल, कारण शांतता हे मानवी विकासाचे मूळ आहे.