जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांत ‘युद्ध’!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 12:38 PM2023-06-02T12:38:40+5:302023-06-02T12:40:02+5:30

ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क. दोन्ही अब्जाधीश. दोघांकडेही गडगंज संपत्ती.

World s richest billionaire War amazon jeff bezos tesla elon musk | जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांत ‘युद्ध’!

जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांत ‘युद्ध’!

googlenewsNext

ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क. दोन्ही अब्जाधीश. दोघांकडेही गडगंज संपत्ती. दोघांकडेही कुबेर पाणी भरतो. जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत दोघांचाही क्रमांक नेहमीच आघाडीवर असतो. पण या दोघांमध्ये आता एक वेगळीच स्पर्धा आणि चुरस निर्माण झाली आहे. कोणाकडे जास्त संपत्ती, कोण जगात सर्वांत श्रीमंत, अब्जाधीशांच्या यादीत आपण सर्वांच्या पुढे कसे राहू यासाठीची तर ही अघोषित स्पर्धा आहेच, पण या दोघांच्या स्पर्धेनं अंतराळातील नव्या स्पर्धेलाही तोंड फुटलं आहे. अर्थातच अंतराळ संशोधन संस्था; ‘नासा’नं दोघांमध्ये या स्पर्धेची ठिणगी आणखी जोरात पेटवून दिली आहे. त्यामुळे येत्या काळात या दोन्ही अब्जाधीशांमध्ये दोन वेगवेगळ्या स्पर्धा पाहायला मिळतील. यातील पहिली स्पर्धा संपत्तीची असेल, तर दुसरी स्पर्धा दोघांपैकी कोणाची कंपनी सर्वाधिक अंतराळवीरांना अवकाशात घेऊन जाईल याची. कारण यावरच दोघांचंही भविष्य, भवितव्य अवलंबून आहे. 

ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजन या कंपनीशी ‘नासा’नं नुकताच एक करार केला आहे. या करारानुसार नासा ब्लू ओरिजिनला तब्बल ३.४ अब्ज डॉलर्स देईल. त्या बदल्यात ब्लू ओरिजिननं नासाला ‘अर्टेमिस ५’ या मिशनसाठी ‘लुनार लॅण्डर’ तयार करून द्यायचं आहे. यातली महत्त्वाची गोम अशी की, केवळ दोन वर्षांआधीच ब्लू ओरिजिनचा हा प्रस्ताव नासानं सपशेल धुडकावला होता आणि टेस्ला, ट्विटरचे सर्वेसर्वा, स्पेस एक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांच्यासोबत हा करार केला होता आणि त्यांना लुनार लॅण्डर तयार करण्याचे सर्वाधिकार दिले होते. त्याचवेळी अनेकांना वाटत होतं की, नासा किमान दोन कंपन्यांना यासाठी परवानगी देईल आणि त्यांच्याशी या संदर्भात करार करेल. पण सगळ्यांचेच अंदाज फोल ठरले आणि हे कॉन्ट्रॅक्ट इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीला देण्यात आलं. 

जेफ बेझोस यांनी या संदर्भात नासाला कोर्टातही खेचलं होतं... पण नासाचं म्हणणं होतं, ‘लुनार लॅण्डरसाठी इलॉन मस्क यांनी जेवढे पैसे मागितले, त्याच्या जवळपास दुप्पट रकमेची मागणी जेफ बेझॉस यांनी केली होती. या व्यतिरिक्त इतर बड्या कंपन्याही या स्पर्धेत होत्या, पण त्यांची मागणीही अवास्तव होती. त्यामुळेच आम्ही २०२१मध्ये फक्त स्पेस एक्सशीच करार केला होता.’

नासाचं म्हणणं अमेरिकेच्या फेडरल कोर्टानंही मान्य केलं आणि निकाल त्यांच्या बाजूनं लागला. त्यामुळे जेफ बेझोस यांना हात चोळत बसावं लागलं होतं. त्यावेळी नासानं स्पेस एक्सशी २.८९ अब्ज डॉलर्सचा करार केला होता. त्यानंतर दोनच वर्षांनी म्हणजे काही दिवसांपूर्वीच नासानं आता इलॉन मस्कच्या स्पेस एक्सला डावलून जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन या कंपनीशी ३.४ अब्ज डॉलर्सचा करार केला आहे. लुनार लॅण्डरचं डिझाइन करणं, त्याची पडताळणी घेणं, नासाचं मानवरहित यान जेव्हा चंद्राच्या दिशेनं झेपावेल, चंद्रावर विसावेल, तोपर्यंतची सारी व्यवस्था ब्लू ओरिजिनला बघावी लागेल. २०२९मध्ये अंतराळवीरांना घेऊन नासाचं यान चंद्रावर पुन्हा उतरणार आहे, तत्पूर्वी लुनार लॅण्डरमध्ये कोणताही दोष राहणार नाही, याची काळजी ब्लू ओरिजिनला घ्यावी लागणार आहे.

ब्लू ओरिजिन आणि स्पेस एक्स. आता या दोन्हीही बड्या कंपन्यांच्या हातात नासाचे करार आहेत. दोघांचीही प्रतिष्ठा उंचावली आहे. पण यामुळे स्पर्धा थंडावली नसून आता त्यांच्यात आणखीच चुरस निर्माण झाली आहे. शिवाय ही स्पर्धा याच दोन्ही कंपन्यांमध्ये असेल, असंही नाही. इतरही कंपन्यांना यात आपला वाटा आणि हिस्सा शोधता येईल. या संदर्भात नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत तर नासानं स्पष्टच सांगितलं, ‘हो, आम्ही जेफ बेझॉस आणि इलॉन मस्क यांच्यामध्ये स्पर्धा लावून दिली आहे, पण अंतिमत: नासाच्या, देशाच्या आणि नागरिकांच्या हितासाठी ते चांगलंच आहे. खर्च कमी होईल, सर्वसामान्य नागरिकांचा घामाचा, कराचा पैसा यामुळे वाचेल. नासालाही चांद्र आणि मंगळ मोहिमांसाठीची आपली ध्येयं गाठण्यासाठी मदत होईल, अंतराळ अर्थव्यवस्थेत वाढ होईल...’

जमीन आणि आकाशावर राज्य कोणाचं? 
इलॉन मस्क आणि जेफ बेझॉस. फोर्ब्जच्या यादीत २५ मे २०२३ अखेर मस्क यांची संपत्ती १८७.४ अब्ज डॉलर्स असून, सध्या जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या थोडेसेच मागे असलेले जेफ बेझॉस यांची संपत्ती आहे १३९.४ अब्ज डॉलर्स आणि ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. शास्त्रज्ञांना आणि विशेष म्हणजे सर्वसामान्य लोकांनाही अंतराळात घेऊन जाण्याचं दोघांचंही स्वप्न आहे. या स्पर्धेत जो पुढे राहील, त्याचंच राज्य नंतर पृथ्वीवर आणि अंतराळातही असेल, हे या दोघांनाही चांगलंच माहीत आहे. त्यांच्यात सध्या काॅंटे की टक्कर, ‘युद्ध’ सुरू आहे ते यामुळेच!

Web Title: World s richest billionaire War amazon jeff bezos tesla elon musk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.