रशिया पेटवणार तिसरे महायुद्ध?; युक्रेनच्या सीमेवर कुठल्याही क्षणी सैन्य सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 09:53 AM2022-02-16T09:53:22+5:302022-02-16T10:36:42+5:30
गेल्या वर्षी नोव्हेंबरातच रशियाने युक्रेनच्या दिशेने वाटचाल सुरू केली. रशियाचा दोस्तराष्ट्र असलेल्या बेलारूसच्या साह्याने १ लाख १० हजार सैनिक युक्रेनच्या सीमेनजीक आले हाेते.
युक्रेनची चहूबाजूंनी कोंडी करणाऱ्या रशियाच्या फौजा आता कोणत्याही क्षणी या देशाचा घास घेण्यासाठी सज्ज आहेत. प्रचंड फौजफाटा रशियाने युक्रेनच्या आजूबाजूला आणून ठेवला आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धांचे सूप वाजले की, म्हणजे १६ फेब्रुवारीला, युक्रेनच्या सीमारेषेवर रणभेरी वाजवण्याचा रशियाचा इरादा आहे.
बेलारूसमध्ये शस्त्र साठा?
बेलारूसमध्ये रशियाचे ३० हजार सैनिक असून त्यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा केला असल्याचे नॉर्थ ॲटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन अर्थात ‘नाटो’चा दावा आहे. शस्त्रसाठ्यात सुखोई-३५ फायटर जेट्स, एस-४०० एअर डिफेन्स सिस्टीम आणि ५०० किमी अंतरापर्यंत मारा करू शकणारी अण्वस्त्रधारी इस्कंदर क्षेपणास्त्रे इत्यादींचा समावेश आहे, असे ‘नाटो’ म्हणते. क्रिमियामध्येही १० हजार रशियन सैनिक उतरले असावेत असा अमेरिकेला संशय आहे. युद्धसज्ज रशियाने ७ हजार टन इंधनसाठा तयार ठेवला आहे.
सैन्याची जमवाजमव किती?
गेल्या वर्षी नोव्हेंबरातच रशियाने युक्रेनच्या दिशेने वाटचाल सुरू केली. रशियाचा दोस्तराष्ट्र असलेल्या बेलारूसच्या साह्याने १ लाख १० हजार सैनिक युक्रेनच्या सीमेनजीक आले हाेते. आता ही संख्या दीड लाखांपर्यंत पोहोचली असल्याचा नार्वेजियन गुप्तचरांचा होरा आहे. त्याचबरोबर डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या बफर प्रदेशातही ३२ हजार सैनिक पेरण्यात आले आहेत.
नॉर्ड स्ट्रीम-२ चे महत्त्व
रशियातून थेट जर्मनीपर्यंत वाहिनीद्वारे नैसर्गिक वायूपुरवठा करण्याचा हा प्रकल्प आहे. बाल्टिक समुद्रातून ही प्रस्तावित वायुवाहिनी जाणार आहे. त्यामुळे युक्रेनचा तिळपापड झाला आहे. हा प्रकल्प होऊ नये यासाठी युक्रेनने जंगजंग पछाडले. रशियाकडून युरोपला जाणाऱ्या अनेक गॅसवाहिन्या युक्रेनमधून जातात. युद्ध झाल्यास युक्रेन या गॅसवाहिन्यांची कोंडी करेल, ही रशियाची भीती नॉर्ड स्ट्रीम-२ मुळे कमी झाली आहे. नॉर्ड स्ट्रीम-२ हा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्यामाध्यमातून त्यांना रशियाला गतवैभव प्राप्त करून द्यायचे आहे.