केनियाच्या निवडणुकीकडे जगाचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 12:33 PM2017-08-08T12:33:58+5:302017-08-08T12:37:32+5:30
2007 साली केनियामध्ये झालेल्या कुप्रसिद्ध निवडणुकांनंतर आता देशाच्या स्थितीमध्ये कितपत बदल झाला आहे हे या निवडणुकीच्या यशावरुन सिद्ध होईल. 2007 साली झालेल्या निवडणुकीच्या काळामध्ये दोन महिने हिंसाचार चालू होता. या हिंसाचारामध्ये 1100 लोकांनी प्राण गमावले होते तर सुमारे 60,000 लोक बेपत्ता झाले होते.
नैरोबी, दि.8- केनियामध्ये होत असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरु झाले आहे. उहुरु केन्याटा आणि रायला ओडिंगा यांच्यामध्ये होत असलेल्या या निवडणुकीत जोरदार चुरस दिसून आली. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक अधिकाऱ्याची हत्या झाल्यामुळे केनियाच्या या निवडणुकीतही हिंसाचार होणार अशी चिन्हे दिसत होती. 2007 साली केनियामध्ये झालेल्या कुप्रसिद्ध निवडणुकांनंतर आता देशाच्या स्थितीमध्ये कितपत बदल झाला आहे हे या निवडणुकीच्या यशावरुन सिद्ध होईल. 2007 साली झालेल्या निवडणुकीच्या काळामध्ये दोन महिने हिंसाचार चालू होता. या हिंसाचारामध्ये 1100 लोकांनी प्राण गमावले होते तर सुमारे 60,000 लोक बेपत्ता झाले होते.
आता निवडणूक अधिकारी क्रिस मसांडो यांच्या हत्येमुळे केनियन निवडणुकांच्या निःपक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. क्रिस यांच्या मृतदेहाची अॅटोप्सी केल्यानंतर त्यांचा मृत्युपुर्वी छळ केल्याचे स्पष्ट झाले आहे. क्रिस यांच्यावर मतदारांची इलेक्ट्रॉनिक ओळख करण्याची जबाबदारी होती. त्यांचीच हत्या झाल्यामुळे संपुर्ण निवडणुकांवर संशयाचे ढग जमा झाले आहेत. आज मतदान प्रक्रियेमध्ये 2 कोटी केनियन मतदार सहभाग घेत आहेत. अध्यक्ष उहुरु केन्याटा यांनी मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. आपली लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करा. तुम्हाला हव्या त्या उमेदवाराला मतदान करा. मतदानानंतर शांततेत घरी जा, शेजाऱ्याशी हस्तांदोलन गप्पा करा, काहीतरी खा आणि निकालाची वाट पाहा असा संदेश त्यांनी नागरिकांना दिला आहे.
उहुरु केन्याटा यांच्या कुटुंबाने केनियामधील सत्ता दीर्घकाळ उपभोगली आहे. उहुरु यांचे वडिल जोमो केन्याटा केनियाचे पहिले पंतप्रधान होते. 1963-64 या कालावधीत पंतप्रधान झाल्यानंतर जोमो राष्ट्राध्यक्ष झाले. 1964-1978 इतका प्रदिर्घ काळ ते पदावर राहिले. त्यांच्यानंतर त्यांच्या जवळचे मानले जाणारे डॅनियल अरॅप मोई अध्यक्ष झाले ते 1978 ते 2002 इतका मोठा काळ पदावरती होते. त्यानंतर म्वाई किबेकी हे जोमो केन्याटांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य असणारे, मोई यांच्या काळात उपराष्ट्रपती असणारे 2002 ते 2013 या काळासाठी अध्यक्ष झाले, पण ते स्वतंत्र पक्षातून निवडून आले होते. त्यानंतर 2013 पासून उहुरु केन्याटा राष्ट्राध्यक्ष आहेत. उहुरु 2003 ते 2007 या कालावधीत विरोधीपक्षनेते होते, 2008 ते 2013 याकाळात त्यांच्याकडे उपपंतप्रधानपदाची जबाबदारी होती.
बराक ओबामांचेही आवाहन
केनियामधील मतदान प्रक्रिया शांततेत व्हावे यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही आवाहन केले आहे. बराक ओबामा यांच्या वडिलांचा जन्म केनियामध्ये झाला होता, त्यामुळे त्यांचे केनियाशी भावनिक नाते आहे. ओबामा यांनी केनियन नागरिकांना हिंसेला पाठिंबा न देता लोकांच्या इच्छेचा सन्मान करण्याचा संदेश दिला आहे. त्याचप्रमाणे सुरक्षा दलांनी निःपक्षपातीपणे काम करावे अशीही विनंती केली आहे.