टीव्हीवर बातम्या देण्यासाठी येणार आर्टिफिशियल न्यूज अँकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 12:47 PM2018-11-09T12:47:27+5:302018-11-09T13:05:12+5:30
आर्टिफिशिअल इंटेलिजेंस (एआय) या तंत्रज्ञानावर आधारित न्यूज अँकर काम करणार आहे. शिन्हुआने जवळपास 2 मिनिटांचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.
बीजिंग - चीनच्या सरकारी न्यूज चॅनेलवर एक आगळा वेगळा प्रयोग करण्यात आला आहे. शिन्हुआ या वृत्तसंस्थेने गुरुवारी (8 नोव्हेंबर) एक व्हर्चुअल न्यूज रीडर सादर केला. आर्टिफिशिअल इंटेलिजेंस (एआय) या तंत्रज्ञानावर व्हर्चुअल न्यूज अँकर काम करतो. व्हर्चुअल अँकर निर्माण करण्यात चीनी सर्च इंजिन 'सोगो'ची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. सोगोने खास शिन्हुआसाठी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, व्हर्चुअल अँकर हा रोबोट किंवा मानवाचे 3D डिजिटल मॉडेल नाही. तर ते केवळ मानवासारखं हुबेहुब दिसणारं एक अॅनिमेशन आहे. शिन्हुआने जवळपास 2 मिनिटांचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. प्रोफेशनल न्यूज अँकर ज्या पद्धतीने बातम्या वाचतात त्याचप्रमाणे आर्टिफिशियल न्यूज अँकर बातम्या देईल असा दावा वृत्तसंस्थेने केला आहे.
Xinhua AI anchor, launched on Wednesday, starts presenting news reports from Thursday. In this program, he takes you to have a look at what a Panama official and the Chinese businessman Jack Ma say about the ongoing #CIIE. pic.twitter.com/OZkRQtv1sQ
— China Xinhua News (@XHNews) November 8, 2018
आर्टिफिशियल न्यूज अँकरचा आवाज, ओठांची हालचाल, चेहऱ्यावरील हावभाव हे प्रोफेशन अँकरसारखेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आर्टिफिशियल न्यूज अँकर सुरुवातीला पाहिलं असता प्रोफेशनलच वाटतो. व्हर्चुअल न्यूज अँकर वेबसाईट आणि सोशल मीडिया चॅनेलसाठी सलग 24 तास काम करू शकतो. यामुळे खर्चही कमी होतो. तसेच वेळोवेळी ब्रेकिंग न्यूज सांगण्यासाठी या अँकरचा खूप उपयोग होणार असल्याचंही शिन्हुआने म्हटलं आहे.