Bubble Hotel: सिंगापूरमध्ये जगातील पहिलं 'बबल बिझनेस हॉटेल'; नेमकं कसं आहे हे हॉटेल?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 05:06 PM2021-03-10T17:06:06+5:302021-03-10T17:06:44+5:30
Singapore Bubble Hotel: सिंगापूरमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या (Covid-19) पार्श्वभूमीवर एक अनोखं हॉटेल तयार करण्यात आलं आहे.
सिंगापूरमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर एक अनोखं हॉटेल तयार करण्यात आलं आहे. 'बबल बिझनेस हॉटेल' असं या हॉटेलचं नाव आहे. ज्या लोकांना कामानिमित्त प्रत्यक्षरित्या भेटणं गरजेचं आहे अशा लोकांना या हॉटेलमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन भेट घेता येणार आहे. (worlds first Bubble Business Hotel in Singapore)
कोरोनाा धोका टाळणारं आणि सुरक्षितपणे बैठक घेता येईल अशी सुविधा देणारं हे जगातील पहिलं हॉटेल ठरलं आहे. पण या हॉटेलमध्ये ग्राहकांना काही कडक नियमांचंही पालन करावं लागणार आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला आखून देण्यात आलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं बंधनकारक आहे. मिटींग झाल्यानंतर किंवा काम आटोपल्यांतर तुम्हाला थेट विमानतळावरच परतावं लागतं. हॉटेल आणि विमानतळ व्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची ग्राहकांना परवानगी नाही.
हॉटेल नेमकं कसं दिसतं?
बबल हॉटेल अतिशय सुंदर पद्धतीनं डिझाइन करण्यात आलं आहे. प्रत्येक रुममध्ये एअरटाइट ग्लास तयार करण्यात आले आहेत. याशिवाय, कागदपत्रांसह सर्वच गोष्टी इथं काळजीपूर्वकपणे सॅनिटाइझ केल्या जातात. हे हॉटेल शहर आणि देशातील इतर हॉटेल्सपेक्षा वेगळं आहे. कोविड चाचणी केलेल्यांनाच या हॉटेलमध्ये प्रवेश आहे.
हॉटेलचे पहिले पाहुणे कोण?
बबल हॉटेलमध्ये पहिले पाहुणे हे फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया आणि संयुक्त अरब अमिरात येथून आले आहेत. त्यातील एका ग्राहकानं सिंगापूरमध्ये कंपनीच्या अतिशय महत्वाच्या बैठकीसाठी या हॉटेलमध्ये आल्याचं सांगितलं. हॉटेलच्या एका रुमचं एका रात्रीचं भाडं तब्बल २८४.७० यूएस डॉलर इतकं आहे. यात जेवणं, कोविड चाचणी आणि एअरपोर्टपर्यंतच्या प्रवासाचा खर्च देखील जोडण्यात आला आहे.