येत आहे जगातले पहिले चालकरहित जहाज !
By admin | Published: May 4, 2016 04:40 AM2016-05-04T04:40:53+5:302016-05-04T04:40:53+5:30
हवाई सफर करून ठरलेल्या ठिकाणी जाणाऱ्या मानवरहित ड्रोनचे तंत्र आता सुप्रस्थापित झाले असून, त्यांचा विविध जोखमीच्या कामांसाठी वापरही केला जात आहे. चालकरहित
सॅन दिएगो (अमेरिका) : हवाई सफर करून ठरलेल्या ठिकाणी जाणाऱ्या मानवरहित ड्रोनचे तंत्र आता सुप्रस्थापित झाले असून, त्यांचा विविध जोखमीच्या कामांसाठी वापरही केला जात आहे. चालकरहित मोटार विकसित करण्याचे कामही प्रगतिपथावर आहे. याच धर्तीवर कप्तान किंवा अन्य कोणीही खलाशी नसलेले सागरी जहाजही आता येऊ घातले असून, जगातील अशा पहिल्या पूर्णपणे स्वयंचलित जहाजांच्या चाचण्या अमेरिकेच्या संरक्षण दलांनी सुरू केल्या आहेत.
‘सी हन्टर’ असे या १३२ फूट लांबीच्या जहाजाचे नाव असून, सफरीसाठी तयार केले गेलेले जगातील आतापर्यंतचे ते सर्वात मोठे पूर्णपणे मानवरहित वाहन आहे. हे जहाज कोणाही कप्तानाच्या संचालनाविना
१० हजार सागरी मैलांपर्यंतचा प्रवास आपणहून करू शकते व जाताना वाटेत ते सागरात दडलेल्या पाणबुड्या आणि सागरतळाशी पेरलेल्या पाणसुरुंगाचाही शोध घेऊ शकते.
‘सी हन्टर’च्या प्रत्यक्ष सागरी चाचण्या सुरू होण्यापूर्वी अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने (पेंटॅगॉन) माध्यम प्रतिनिधींचा दौरा आयोजित करून, त्यांना भविष्यात सागरी सफरींच्या भविष्याला कलाटणी देऊ शकणाऱ्या या नव्या प्रकल्पाची माहिती दिली. अमेरिकी लष्कराची ‘डिफेन्स अॅडव्हान्स्ड रीसर्च प्रॉजेक्ट्स एजन्सी (डीएआरपीए) ही संशोधन व विकास शाखा आणि नौदल मिळून पुढील दोन वर्षे सॅन दिएगो सागर किनाऱ्यालगत त्याच्या चाचण्या घेणार आहे. विशेषत: हे जहाज स्वत:च मार्गनिर्धारण करून प्रवास करताना इतर सागरी वाहनांची वेळीच दखल घेऊन त्यांच्याशी टक्कर होण्याचे किती यशस्वीपणे टाळू शकते, हा या चाचण्यांचा मुख्य रोख असेल. सॅन दिएगोच्या जहाज बांधणी आवारातील एका धक्क्यावर नांगर टाकून उभ्या असलेल्या करड्या रंगाच्या पोलादी जहाजाची वैशिष्ट्ये सांगताना ‘डीएआरपीए’चे प्रवक्ते जेरेड बी. अॅडम्स म्हणाले, ‘हे काही ‘जॉय स्टिक’ने चालवायचे (खेळण्यातील) जहाज नाही! ‘सी हन्टर’ राडार, सोनार, कॅमेराव जीपीएस यंत्रणांनी सुसज्ज आहे. मात्र, तूर्तास तरी लष्करी वापरासाठी त्यास शस्त्रायुधांनी सज्ज करण्याची योजना नाही.’
मालवाहतूकदारांचे लक्ष
‘सी हंटर’च्या चाचण्यांकडे लष्करी धुरिणांसोबतच व्यापारी जहाज वाहतूक व्यावसायिकांनाही स्वारस्य आहे. परिचालन खर्च कमी करण्यासाठी व सागरी चाच्यांचा उपद्रव असलेल्या मार्गांवर प्रवासासाठी मानवरहित मालवाहतूक जहाजांचा वापर करता येईल का, याचा विचार युरोप व आशियातील कंपन्यांनी सुरू केला आहे, परंतु अशा प्रकारची ‘रोबोटिक जहाजे’ खरोखरच कितपत सुरक्षित असतील, यावर शंका घेतली जात आहे.
जगभरातील व्यापारी जहाजांवर सध्या १० लाखांहून अधिक कर्मचारी व अधिकारी काम करीत आहेत. साहजिकच, मानवरहित जहाजे त्यांच्या पोटावर पाय आणतील. जगभरातील निम्म्याहून अधिक जहाज कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन’च्या मते सागरी सफरींमध्ये वेळोवेळी नानाविध अनपेक्षित धोके समोर उभे ठाकत असतात. या धोक्यांचे पूर्वानुमान करून त्यांचा सामना माणूस जेवढ्या समर्थपणे करू शकतो, तेवढा तंत्रज्ञान करू शकेल, यावर आमचा विश्वास नाही. (वृत्तसंस्था)
१२ कोटी डॉलर खर्च
- ‘सी हंटर’ची बांधणी ओरेगॉन किनाऱ्यावर करण्यात आली व तेथून ते
बार्जने खेचत सॅन दिएगो सागरकिनारी आणले. तूर्तास ‘प्रोटाटाइप’ म्हणून बांधण्यात आलेले हे जहाज ताशी ३० सागरी मैल वेगाने प्रवास करू शकते.
- हे प्रायोगिक जहाज बांधायला १२० दशलक्ष डॉलर (सुमारे १२ कोटी) खर्च आला, पण नियमित उत्पादन सुरू झाल्यावर हा खर्च ३० दशलक्ष डॉलरपर्यंत कमी होऊ शकेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सुरुवातीस खबरदारीचा उपाय म्हणून वेळ आलीच तर सुकाणू हाती घेता यावे, यासाठी चाचण्यांच्या काळात या जहाजावर मानवी संचालक कर्मचारी तैनात असतील, परंतु एकदा का त्याच्या स्वयंचलित यंत्रणांनी विश्वासार्हता सिद्ध केली की, ते सलग कित्येक महिने स्वत:चा स्वत: प्रवास करू शकेल. दोन डिझेल इंजिनांच्या जोरावर ते एका सफरीत सॅन दिएगोपासून गुआमपर्यंतचा प्रवास न थांबता करू शकेल.