जगातील सर्वांत मोठे हॉटेल मक्केत
By Admin | Published: August 5, 2016 04:16 AM2016-08-05T04:16:31+5:302016-08-05T09:45:41+5:30
मक्का शहरात जगातील सर्वात मोठे निवासी हॉटेल उभे राहात असून सर्वकाही ठरल्याप्रमाणे पार पडल्यास ते पुढील वर्षी पाहुण्यांचे स्वागत करण्यास सज्ज होईल
रियाध: मुस्लिमांचे सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या मक्का शहरात जगातील सर्वात मोठे निवासी हॉटेल उभे राहात असून सर्वकाही ठरल्याप्रमाणे पार पडल्यास ते पुढील वर्षी पाहुण्यांचे स्वागत करण्यास सज्ज होईल.मक्का शहराच्या मध्यवस्तीत मनाफिया भागात पवित्र काबापासून दोन किमी अंतरावर हे हॉटेल उभे असून राहत 10000 निवासी खोल्या असलेले सर्वात मोठे हॉटेल ठरेल.
सौदी अरबस्तानच्या वित्त मंत्रालयाने तेथील राजघराण्याचा अत्यंत लाडका आणि महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प हाती घेतला असून त्यासाठी ३.५ अब्ज डॉलर एवढा प्रचंड खर्च केला जात आहे. इस्लामच्या मक्का व मदिना या दोन सर्वात पवित्र तीर्थस्थळांचे रखवालदार असे स्वत:ला म्हणवून घेणाऱ्या सौदी सरकारने या हॉटेलचे नावही इस्लामने प्रेरित होऊन ‘अबराज खुदाई’ (परमेश्वरी निवासस्थान) असे निवडले आहे.
7351 निवासी खोल्या असलेले मलेशियातील ‘फर्स्ट वर्ल्ड हॉटेल’ हे जगातील सध्या सर्वात मोठे हॉटेल मानले जाते. ‘अबराज खुदाई’मध्ये याहून अडीच हजार निवासी खोल्या जास्त असतील. दार-अल- हांदासाह ग्रुपने या अतिभव्य हॉटेलचे डिझाईन केले आहे.
>हॉटेल संकुलातील केंद्रस्थानी असलेला टॉवर सर्वात उंच म्हणजे ४८ मजली असेल व त्यावरील घुमट हा जगातील सर्वात मोठा घुमट असेल. बाजूला दोन टॉवर उंचीने त्याहून कमी असतील व त्यावरील घुमटांखाली बॉलरूम व कन्व्हेंशन सेंटर असेल. याच्या बाहेर चार टॉवरच्या छतावर चार हेलिपॅड असतील. हॉटेलच्या पोडियमवर बस स्टेश्न, शॉपिंग मॉल, उपाहारगृहे, फूड कोर्ट, कॉन्फरन्स सेंटर आणि वाहनतळ असेल. राजघराण्यातील सदस्यांचे येथे वरचेवर येणे अपेक्षित असल्याने त्यांच्यासाठी संपूर्ण मजले स्वतंत्रपणे आरक्षित करता येतील अशीही व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रचंड आकार, गगनचुंबी उंची, मध्यवर्ती ठिकाण आणि आधुनिक व इस्लामी वास्तुकलेचा मिलाफ साधून केलेले बांधकाम यामुळे हे हॉटेल म्हणजे मक्का शहराचे नवे आकर्षण आणि खास ओळख ठरेल.