जगातील सर्वांत महागडा घटस्फोट मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 04:43 AM2019-07-07T04:43:42+5:302019-07-07T04:45:01+5:30
३८ अब्ज डॉलरची पोटगी देऊन जेफ बेझोस २५ वर्षांनंतर एकमेकांपासून झाले विभक्त
वॉशिंग्टन : अॅमेझॉन इन्कॉर्पोरेटेड या आॅनलाइन मार्केटिंगच्या क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या कंपनीचे संस्थापक मालक जेफ बेझोस आणि त्यांची पत्नी मॅकेन्झी बेझोस यांच्या सहमतीच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाले आहे. पोटगी म्ह़णून पतीकडून पत्नीला ३८.३ अब्ज डॉलरची (सुमारे २५ लाख कोटी रुपये) संपत्ती देणारा जगाच्या इतिहासातील आजवरचा हा सर्वात महागडा घटस्फोट ठरला आहे.
गेली २५ वर्षे पती-पत्नी असलेल्या जेफ व मॅकेन्झी या दाम्पत्याने विभक्त होण्याचा आपला इरादा गेल्या जानेवारीत टिष्ट्वटरवर जाहीर केला होता. या घटस्फोटासाठी दोघांमध्ये झालेल्या समझोत्यावर सिएटल येथील न्यायालयाने शुक्रवारी शिक्कोमोर्तब केले. आकडा वाचूनही सर्वसामान्यांना भोवळ येईल एवढी संपत्ती फारकतीसाठी पत्नीच्या हवाली करूनही जेफ बेझोस यांचे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हे अव्वल स्थान व अॅमेझॉन कंपनीवरील नियंत्रण अबाधित राहील.
अॅमेझॉन कंपनीचे एकूण १६ टक्के भागभांडवल बेझोस दम्पतीकडे संयुक्तपणे होते. त्यापैकी ३८ अब्ज डॉलर एवढ्या प्रचलित मूल्याचे चार टक्के भागभांडवल घटस्फोटानंतर मॅकेन्झी यांच्या एकटीच्या मालकीचे होईल. त्यामुळे त्या जगातील चौथ्या क्रमांकाच्या सर्वाधिक श्रीमंत महिला होतील. घटस्फोटानंतरही जेफ यांच्याकडे अॅमेझॉनचे १२ टक्के भागभांडवल कायम राहील. त्याचे सध्याचे मूल्य ११४.८ अब्ज डॉलर एवढे असेल.
अॅमेझॉनचे चार टक्के भागभांडवल नावावर झाले तरी त्याचे कंपनीच्या सभांमधील मतदानाचे हक्क मात्र मॅकेन्झी यांनी जेफ यांच्याच हाती पुन्हा सुपूर्द केले आहेत. त्यामुळे अॅमेझॉनचे नियंत्रक मालक ही जेफ यांची बिरुदावली कायम राहील. (वृत्तसंस्था)
निम्म्या संपत्तीचा दानधर्म
अब्जाधीश गुंतवणूकदार वॉरेन बफेट व मायक्रोसॉफ्टच संस्थापक बिल गेट््स यांनी जगभरातील गर्भश्रीमंतांना आपली जास्तीत जास्त संपत्ती दान करण्याचे आवाहन करून सन २०१० मध्ये एक खुला वचननामा जारी केला होता.
मॅकेन्झी बेझोस यांनी या वचननाम्यावर स्वाक्षरी करून आपली निम्मी संपत्ती दान करण्याचे मे महिन्यातच जाहीर केले होते. त्यामुळे घटस्फोटापोटी मिळणाऱ्या ३८ अब्ज डॉलरपैकी निम्म्या संपत्तीचा त्या दानधर्म करतील. जेफ व मॅकेन्झी यांना दोन अपत्ये असून घटस्फोटानंतर त्याच्या पालकत्वासंबंधी उभयतांनी स्वतंत्र समझोता केला आहे.