जगातील सर्वांत वयोवृृद्ध जपानी महिलेचे निधन
By admin | Published: April 2, 2015 02:49 AM2015-04-02T02:49:26+5:302015-04-02T02:49:26+5:30
जगातील सर्वांत वयोवृद्ध महिला मिसाओ ओकावा यांचे बुधवारी जपानमध्ये निधन झाले. गेल्या महिन्यातच त्यांचा ११७ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता
तोक्यो : जगातील सर्वांत वयोवृद्ध महिला मिसाओ ओकावा यांचे बुधवारी जपानमध्ये निधन झाले. गेल्या महिन्यातच त्यांचा ११७ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. ओसाका येथील नर्सिंग होममध्ये सकाळी ७ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ओकावा यांचा जन्म ५ मार्च १८९८ रोजी झाला होता.
१९ व्या शतकामध्ये जन्मलेल्या व २१ व्या शतकात हयात असलेल्या म्हणजेच दोन सहस्रके उलटताना पाहणाऱ्या मोजक्या व्यक्तींत ओकावा यांचा समावेश होता. ओकावा यांचा जन्म ५ मार्च १८९८ रोजी झाला होता. त्यांच्या जन्मानंतर पाच वर्षांनी अमेरिकी राईट बंधूंनी जगातील पहिले विमान उडविले होते. त्या किशोरवयीन असताना पहिल्या महायुद्धास तोंड फुटले होते, तर त्या सत्तरीत पोहोचल्यानंतर मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले होते. ओकावा ११४ वर्षांच्या झाल्यानंतर गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वाधिक वयाची जिवंत व्यक्ती म्हणून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली होती. जपानमधील नागरिक दीर्घायुषी असतात. जपानमधील साकारी मोमोई यांनीही शंभरी पार केली आहे. फेब्रुवारीमध्ये त्यांनी ११२ वा वाढदिवस साजरा केला. ओकावा यांच्यानंतर अमेरिकेतील गरट्रूड वेव्हर हे जगातील सर्वाधिक वयाचे जिवंत व्यक्ती मानले जातात. त्यांचे वय ११६ वर्षे आहे.
गेल्या महिन्यात त्यांच्या वाढदिवसचे राष्ट्रीय वाहिनीवर थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. कमीत कमी आठ तास झोप आणि आवडता सुशी आहार हे आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य असल्याचे तीन अपत्ये, चार नातू व सहा पणतू असलेल्या ओकावा यांनी तेव्हा सांगितले होते.