ही आहे जगातील सर्वांत श्रीमंत गाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2017 04:39 AM2017-03-06T04:39:29+5:302017-03-06T04:39:29+5:30
कॅनडातील ज्या गाईबद्दल सांगणार आहोत तिची किंमत आहे २२ कोटी रुपये.
ओटावा : तुम्ही भारतातील सर्वात ९ कोटी रुपये किमतीच्या रेड्याबाबत ऐकले असेल. मात्र, या रेड्याशिवाय जगात अशी एक गाय आहे जिची किंमत सांगितली तर तुम्ही म्हणाल, छे, शक्यच नाही. आम्ही कॅनडातील ज्या गाईबद्दल सांगणार आहोत तिची किंमत आहे २२ कोटी रुपये.
‘ईस्टसाईड लेविसडेल गोल्ड मिस्सी’ असे या गायीचे नाव असून, ती जगातील सर्वाधिक किमतीची गाय आहे. या गायीच्या शारीरिक क्षमतेने तिला ‘श्रीमंत’ बनविले आहे. ही गाय हॉल्स्टीन प्रजातीची आहे. या प्रजातीच्या बहुतांश गायी दररोज १५ ते ४० लिटर दूध देतात. त्यामुळे या गायींची जेव्हा निलामी होते तेव्हा तिची खरेदी करण्यासाठी व्यापारी अधिकाधिक किंमत देण्यास तयार होतात. मिस्सीसाठी ३.२३ दशलक्ष डॉलर जवळपास २२ कोटी रुपये एवढी अंतिम बोली लागली होती. या गायींमुळे अमेरिका आणि कॅनडातील दुग्ध उत्पादन वाढले आहे. या गायींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा विशाल आकार. या गायी आकाराने सामान्य गायींहून मोठ्या असतात. जन्मावेळी त्यांच्या वासराचे वजन ४० ते ४५ किलो असते. सामान्यपणे या गायीची लांबी ५८ इंच आणि वजन ५८० किलो असते. या गायीच्या दुधात ३.५ टक्के एवढा स्निग्धांश (फॅट) असतो. जो जर्सी गायीत कमी आहे. या गायीला जास्त तापमान सहन होत नाही.