जगाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात; चीन भांडणंही लावतोय : अमेरिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 11:43 PM2020-05-04T23:43:34+5:302020-05-04T23:43:52+5:30

‘चीन करून घेतोय आपलं उखळ पांढरं!’

The world's security system is under threat; China is also fighting: US | जगाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात; चीन भांडणंही लावतोय : अमेरिका

जगाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात; चीन भांडणंही लावतोय : अमेरिका

Next

अमेरिका/चीन
 

कोरोना व्हायरस या एकाच शत्रूशी संपूर्ण जग मुकाबला करण्याचा प्रयत्न करीत असताना, यामुळे काही देश जवळ आल्याचं दिसत असताना याच व्हायरसमुळे काही देशांमधील संबंध अगदी ताणले गेल्याचं आणि एकमेकांना ते खाऊ की गिळू या नजरेनं पाहात असल्याचंही दिसलं आहे. त्याचं प्रमुख उदाहरण म्हणजे चीनअमेरिका. कोरोना व्हायरसचा उगम चीनमधील प्रयोगशाळेत झाला असून, चीनने मुद्दाम हा वाह्यातपणा करून जगाला संकटात आणल्याचा आरोप तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खुलेआम करीत आहेत. ‘चीनला बघून घेऊ,’ अशा धमक्याही त्यांनी दिल्या आहेत.

याच अध्यायाचा पुढचा भाग म्हणजे चीन, रशिया आणि काही प्रमाणात इराण कोरोनाच्या या महामारीचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करून घेत आहेत. याच माध्यमांतून युरोप आणि नाटो यांच्यामध्ये दुफळी माजवून विभागणी करण्याचा प्रयत्नही चीन करीत आहे, असा नवा आरोप आता सुरू झाला आहे.

यासंदर्भात अमेरिकेचे संरक्षण सचिव मार्क एस्पर यांनी सोमवारी असा दावा केला की, चीननं कोरोनामुळे सगळ्या जगाला संकटाच्या खाईत तर लोटलंच; पण आता चीनच्या बरोबरीनं रशियाही कोरोनाच्या या महामारीचा उपयोग स्वत:च्या फायद्यासाठी करण्याचा कृतघ्नपणा करीत आहे. याचाच फायदा घेऊन युरोपात आपले हितसंबंध मजबूत करण्याचा प्रयत्न या देशांनी चालवला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.

युरोपात सर्वप्रथम मोठ्या प्रमाणात कोरोनाचा उद्रेक झाला तो इटलीमध्ये; पण त्याचाच फायदा घेण्यासाठी चीन आणि रशियानं लगोलग आपली वैद्यकीय उपकरणं, मास्क यांचा पुरवठा इटली आणि इतर युरोपीय देशांना करून त्या माध्यमातून स्वत:ची चांदी करून घेण्याचा गोरखधंदा चालू केला आहे. एवढ्यावरच चीन थांबलेला नाही. त्यानं या देशांची संपूर्ण सुरक्षाव्यवस्था भेदण्याचा आणि खिळखिळी करण्याचा उपद्व्याप चालवला असल्याचंही अमेरिकेचं म्हणणं आहे. आपल्या मोबाईल व तंत्रज्ञान कंपन्यांच्या माध्यमातून चीन सगळ्या जगावर केवळ पाळत ठेवण्याचाच नाही, तर त्यांची सुरक्षा व्यवस्थाही तकलादू करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप केला जात आहे.
‘हुवेई’ आणि ‘झेडटीई’ या चीनमधल्या अतिबलाढ्य बहुराष्ट्रीय टेलिकॉम कंपन्या. स्मार्टफोन्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स फाईव्ह जी नेटवर्क आणि टेलिकम्युनिकेशन इक्विपमेंट्स तयार करणं व ती जगभर विकणं हे काम या कंपन्या करतात. कोरोनाचा उपयोग करून वेगवेगळ्या देशांत त्यांचं ‘जाळं’ आता ते फैलावत आहेत.

या कंपन्यांच्या माध्यमातून जगाला आपल्या ताब्यात ठेवण्याचा कुटिल डाव या महामारीत चीन करीत आहे, असंही एस्पर यांनी म्हटलं आहे. स्वत:चं उखळ पांढरं करून घेणाऱ्या चीनच्या देखाव्याला जगभरातल्या देशांनी अजिबात भुलू नये आणि या कंपन्यांवर तसेच त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकावा, असं आवाहनही अमेरिकेनं केलं आहे. कोरोनानं जगभरात आपली दहशत निर्माण केलेली असतानाच, काही देशांमधलं वितुष्टही असं वाढवलं आहे.
 

Web Title: The world's security system is under threat; China is also fighting: US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.