जगातले सर्वात लहान जिवंत बाळ, वजन केवळ २६८ ग्रॅम!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 02:38 AM2019-03-03T02:38:07+5:302019-03-03T02:38:16+5:30
जपानच्या टोकियोमध्ये जगातल्या सर्वात लहान बाळाचा जन्म झाला. या बाळाजी स्थिती इतकी खालावलेली होती की, त्याला २४ आठवडे आई-वडिलांकडे सोपविले नव्हते.
जपानच्या टोकियोमध्ये जगातल्या सर्वात लहान बाळाचा जन्म झाला. या बाळाजी स्थिती इतकी खालावलेली होती की, त्याला २४ आठवडे आई-वडिलांकडे सोपविले नव्हते. या बाळाचे जन्माच्या वेळचे वजन हे केवळ २६८ ग्रॅम इतके होते. २४ आठवड्यांपूर्वी आईच्या गर्भाशयात बाळाचा विकास होणे थांबले होते. त्यानंतर, सर्जरी करून बाळाला जन्म देण्यात आला. आता २४ आठवड्यांनी या बाळाला चांगल्या तब्येतीसोबत आई-वडिलांकडे सोपविण्यात आले आहे.
आता इतके आहे वजन
जेव्हा बाळाचा जन्म झाला, तेव्हा त्याचे वजन फारच कमी होते. त्यामुळे डॉक्टरांसमोर पेच निर्माण झाला होता. त्यानंतर, डॉक्टरांनी त्याच्यावर वेगवेगळे उपचार केले. आता या बाळाचे वजन ३१७५.१५ ग्रॅम इतके आहे. ही घटना टोकियोच्या कीओ युनिव्हर्सिटी रुग्णालयातील आहे.
या बाळाच्या आईने सांगितले की, ‘मला फक्त इतकंच सांगायचेय की, मी फार आनंदी आहे. खरे तर मला अजिबात वाटले नव्हते की, माझे बाळ जिवंत राहील, पण देवाच्या कृपेने तो जिवंत आणि सुदृढ आहे.’
या बाळावर उपचार करणारे डॉक्टर ताकेशी अरिमित्सु म्हणाले की, जन्म झाला, तेव्हा ते बाळ फारच लहान आणि कमजोर होते. किओ युनिव्हर्सिटी रुग्णालयाच्या नावावर आता जगातल्या सर्वात लहान बाळाची डिलिव्हरी करण्याचे आणि त्याला सुदृढ ठेवण्याचे रेकॉर्ड नोंदविले गेले आहे. या आधी जगातले सर्वात लहान बाळ जन्माला येण्याचे रेकॉर्ड जर्मनीत होते. २००९ मध्ये इथे एका मुलाचा जन्म झाला होता, त्याचे वजन केवळ २७४ ग्रॅम इतकेच होते, तर सर्वात छोट्या मुलीचे रेकॉर्डही जर्मनीतच झाले होते. २०१५ मध्ये इथे २५२ ग्रॅम वजनाची मुलगी जन्माला आली होती.