चीनमध्ये बनलाय जगातील सगळ्यात उंच काचेचा पूल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 07:13 PM2017-12-26T19:13:43+5:302017-12-26T19:17:15+5:30
चीनच्या या काचेच्या पुलावरुन चालणं म्हणजे काही लोकांना एका अर्थी चित्तथरारक वाटतं तर काही लोकांना भयानक आणि जीवघेणं वाटतं.
चीन : जमिनीपासून तब्बल २१८ मीटर उंचीवर तुम्हाला कोणी उभं राहायला सांगितलं तर तुमचं उत्तर काय असेल? जगभर अनेक पुल आहेत जे प्रचंड उंचीवर बांधलेले आहेत. तिथं जाऊन एकदा तरी तो थरार अनुभवण्याची पर्यटकांची इच्छा असते. असाच एक हटके थरार अनुभवण्यासाठी चीनमध्ये एक काचेचा ब्रीज बनवण्यात आलाय. हा ब्रीज जवळपास २१८ मीटर उंच आहे. खाली खोल दरी आणि वर पांढरंशुभ्र आकाश आणि चहूबाजूला निसर्गाचा चमत्कार म्हणावा असं हिरवंगार सौंदर्य. असा नजारा पाहायला कोणाला आवडणार नाही? चीनच्या शिजीयाजूआंग येथे या ब्रीजचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलंय. जगातला हा सगळ्यात मोठा ब्रीज आहे असंही म्हणण्यात येतंय.
तंत्रज्ञान झपाट्याने पुढे जातंय. नवनवीन तंत्रज्ञान वापरून आपल्या देशाला अधिक गतीशील करण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करतोय. त्याचाच एक भाग म्हणून चीनमध्येही हा काचेचा पूल बांधण्यात आलाय. पीपल्स डेलीने या पुलाचा एक व्हिडिओही फेसबूकवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहतानाच अंगावर काटे उभे राहतात. कारण दगड मातीच्या ब्रीजवर आपण कदाचित एवढ्या उंचावर उभे राहूही, पण काचेच्या पुलावर उभं राहणं जरा जास्तच थरारक असेल. ज्यांना थरारक गोष्टींना अनुभवण्याची सवय आहे, तेच या ब्रीजवर जाऊ शकतात. कारण एवढ्या उंचावर चालणं आणि चालताना आपल्या पायाखाली काच आहे हे मनात ठेवून पुढे पुढे जाणं काही ऐरागबाळ्याचं काम नाही.
हांगीगुई सीनिक विभागात दोन बाजूच्या दरम्यान ४८८ मीटरचा हा पूल बांधण्यात आलाय. हा ब्रीज जमिनीपासून २१८ मीटर उंच आहे. म्हणजे जवळपास या उंचावर ६६ मजल्यांची इमारत उभी राहू शकते. हा पूल बनवण्यासाठी तब्बल २ हजार कामगारांची गरज लागली आहे. या पुलावर ५०० लोक एकावेळी राहू शकतात. हा पूल म्हणजे निसर्ग, थरार आणि तंत्रज्ञान जवळून पाहण्याची अनोखी संधी आहे. इस्त्रायल आर्किटेक्चर हेम डोटन यांनी हा पूल बांधला असून अवघ्या दीड वर्षात हा पूल बांधण्यात आला आहे. हा पूल तयार होण्यासाठी जवळपास ४४ हजार कोटीहून खर्च आला असल्याचंही सांगण्यात येतंय.