उ. कोरियाला चोख उत्तर देण्याचा जगाचा इशारा
By admin | Published: January 6, 2016 11:59 PM2016-01-06T23:59:39+5:302016-01-06T23:59:39+5:30
उत्तर कोरियाने केलेल्या हायड्रोजन बॉम्बच्या यशस्वी चाचणीवर त्याच्या शेजारी व पाश्चिमात्य देशांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून
वॉशिंग्टन/बीजिंग : उत्तर कोरियाने केलेल्या हायड्रोजन बॉम्बच्या यशस्वी चाचणीवर त्याच्या शेजारी व पाश्चिमात्य देशांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, उत्तर कोरियाला त्याच्या गंभीर स्वरूपाच्या चिथावणीला तसेच उत्तर दिले जाईल, असे म्हटले.
हायड्रोजन बॉम्बची चाचणी ही संपूर्ण जगाला अनपेक्षित होती. ती करण्याचे आदेश देशाचे प्रमुख किम जोंग-ऊन यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी दिले होते. हायड्रोजन बॉम्बची चाचणी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळत असेल, तर अमेरिकेवर हल्ला करण्याच्या उत्तर कोरियाच्या उद्देशाच्या दृष्टीने हे एक पाऊल पुढे ठरेल. बॉम्बची चाचणी केल्याचा उत्तर कोरियाचा दावा मान्य करणे खूपच घाईचे ठरेल; परंतु कोणत्याही स्वरूपाच्या चिथावणीला योग्य ते उत्तर दिले जाईल, असे अमेरिकेने म्हटले. जपानचे पंतप्रधान शिंझो अबे म्हणाले की, ‘उत्तर कोरियाने जी चाचणी केली ती आमच्या देशासाठी गंभीर स्वरूपाचा धोका असून, आम्ही ती अजिबात सहन करणार नाही.’ ही चाचणी संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचे उल्लंघन करणारी असून, जग अण्वस्त्रमुक्त करण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना गंभीर स्वरूपाचे आव्हान आहे.
ब्रिटनचे परराष्ट्र सचिव फिलीप हॅमंड सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले की, उत्तर कोरियाला चोख उत्तर देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या सदस्यांबरोबर काम करण्यास चीनदेखील तयार आहे. फ्रान्स, आॅस्ट्रेलियानेही या चाचणीला तीव्र शब्दांत विरोध केला असून, फ्रान्सने आंतरराष्ट्रीय पातळीवर चोख उत्तर दिले गेले पाहिजे, असे म्हटले. ही चाचणी उत्तर कोरिया हा बदमाष (रोग) देश असल्याचे सिद्ध करते. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला धोका आहे, असे आॅस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री ज्युली बिशप यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)