जगभर : अपत्याशी विवाह करण्यासाठी याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 05:15 AM2021-04-17T05:15:53+5:302021-04-17T05:16:22+5:30
प्रेमाला वय, जात, धर्म, श्रीमंती... कशाकशाचंही बंधन नसतं; पण त्यात नैतिकता असावी असं म्हटलं जातं. पण, नैतिकता म्हणजे तरी ...
प्रेमाला वय, जात, धर्म, श्रीमंती... कशाकशाचंही बंधन नसतं; पण त्यात नैतिकता असावी असं म्हटलं जातं. पण, नैतिकता म्हणजे तरी काय? प्रेमाच्या पारंपरिक सर्व कल्पनांना उभा-आडवा छेद देणारी एक घटना अमेरिकेत नुकतीच घडली आहे. एका पालकानं आपल्याच जैविक अपत्याशी आपल्याला विवाह करता यावा, यासाठी एक कायदेशीर याचिका न्यू यॉर्कच्या न्यायालयात दाखल केली आहे.
या पालकाचं म्हणणं आहे, विवाह ही वैयक्तिक स्वातंत्र्याची गोष्ट आहे. ज्यांचं एकमेकांवर प्रेम आहे, त्या कुणालाही एक-दुसऱ्याशी विवाह करता आला पाहिजे. त्यामुळेच आजपर्यंत सुरू असलेल्या ‘अनैतिक’ कायदेशीर प्रथांना तिलांजली देऊन माझ्या सज्ञान अपत्याबरोबर विवाहाला मला संमती द्यावी.
नैतिक, सामाजिक आणि जैविकदृष्ट्या माझी ही मागणी अनेकांना तिरस्करणीय, अवमानकारक वाटू शकणारी असल्याने आम्ही अज्ञात राहू इच्छितो, अशी विनंती या पालकानं केल्यानं न्यायालयानंही त्यांच्याबाबतची कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. पालक आणि अपत्य यांचं लिंग, त्यांची नावं, त्यांचं वय, राहण्याचं ठिकाण, त्यांच्या नात्याचं स्वरूप याबाबत काहीच माहिती उघड झालेली नाही. पण, यामुळे अमेरिकेत एकच खळबळ उडाली आहे.
अमेरिका हा देश वैचारिकदृष्ट्या अत्यंत पुढारलेला समजला जातो. स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीतही हा देश बऱ्यापैकी प्रगत आहे. अमेरिकेत १९७५ मध्ये समलिंगी संबंधांना मान्यता मिळाली. कॅलिफोर्नियात २००८ मध्ये तर संपूर्ण अमेरिकेत २०१५ ला समलिंगी विवाहांना मान्यता देण्यात आली. तरीही या घटनेमुळे अमेरिकन समाजातही खळबळ माजली आहे.अशाच प्रकारची, पण समलिंगी विवाहासंबंधातील एक अत्यंत अनोखी घटना काही वर्षांपूर्वी अमेरिकेत घडली आहे.
या घटनेमुळे एक महिला आपल्याच मुलाची आजी आणि नंतर परत आई बनली होती. १९७१ सालची ही घटना, पण २०२० पर्यंत अनेक वर्षे अनेक टप्प्यांतून गेलेल्या या कहाणीची अमेरिकेत आजही चर्चा होते. लिलिअन फेडरमॅन आणि फिलीस इर्विन या दोन महिलांच्या समलिंगी संबंधांची ही कहाणी. १९७१ ला या दोघींची पहिल्यांदा भेट झाली आणि त्या प्रेमात पडल्या, त्या वेळी ‘एलजीबीटीक्यू’ समूहासंदर्भात भेदभाव करणारे कायदे अमेरिकेत होते. लिलिअन यासंदर्भात म्हणतात, त्या वेळी समलिंगी संबंध, आकर्षण नसणाऱ्या व्यक्ती नव्हत्या असं नाही, पण देशाच्या कानाकोपऱ्यातही त्यांच्याविषयी तुच्छता होती आणि त्यांना अपराधी मानलं जायचं.
समलैंगिक संबंध असणारे सारेच जण तेव्हा चोरीछुपेच एकत्र राहायचे. आपले ‘तसे’ काही संबंध आहेत, हे जगाला कळू न देता लिलिअन आणि फिलीस या दोघीही सोबत राहात होत्या. एकत्र राहायला लागल्यानंतर १९७४ मध्ये दोघींनीही मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला. लिलिअन एका फर्टीलिटी क्लिनिकमध्ये गेल्या, पण त्या वेळी अमेरिकेतही कृत्रिम गर्भधारणा, त्यातही एका अविवाहित महिलेसाठी एक असामान्य घटना होती. डॉक्टरांनी लिलिअनला लग्न करायचा सल्ला दिला, पण लिलिअन यांनी डॉक्टरांना कसंबसं मनवलं आणि १९७५ मध्ये कृत्रिम गर्भधारणेद्वारे एका मुलाला त्यांनी जन्म दिला. त्याचं नाव त्यांनी एवरोम ठेवलं.
पण, थोड्याच काळात त्यांना कायदेशीर अडचणींचीही कल्पना आली. कारण फिलीस यांचा लिलिअन आणि एवरोमशी कायदेशीर काहीच संबंध नव्हता. त्यावेळी समलैंगिक दाम्पत्यांना मूल दत्तक घेण्याचा किंवा कृत्रिम गर्भधारणा करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नव्हता. त्यामुळे त्यांनी कायद्यातली एक पळवाट शोधून काढली. त्या वेळी एकमेकांच्या वयात १० वर्षांपेक्षा जास्त अंतर असलं तर एक वयस्क दुसऱ्या वयस्कालाही दत्तक घेऊ शकत होता. त्यामुळे वयानं जवळपास वीस वर्षांनी मोठ्या असलेल्या फिलीस यांनी लिलिअनला दत्तक घेतलं. त्यांचं कायदेशीर नातं आई आणि मुलीचं झाल्यामुळे आपोआपच फिलीस या एवरोमच्या कायदेशीर आजी झाल्या.
२००८ मध्ये कॅलिफोर्नियात समलैंगिक विवाहांना कायदेशीर अनुमती मिळाली. कायदा लागू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दोघींनीही विवाह केला. पण, संपूर्ण अमेरिकेत हा कायदा लागू नव्हता. इतर ठिकाणी तो गुन्हा होता. शिवाय आधीचं दत्तक विधान रद्द न केल्यामुळे त्यांचा विवाहही कायदेशीर नाही हे दोघींनाही नंतर कळलं. २०१५ मध्ये संपूर्ण अमेरिकेत समलैंगिक विवाहांना मान्यता देण्यात आली. त्या वेळी त्यांनी दत्तकविधान रद्द करून पुन्हा एकदा लग्न केलं! पण, कहाणी अजून संपलेली नव्हती..
...आता ‘नातू’ झाला मुलगा!
दोघींनी परत एकदा कायदेशीर लग्न तर केलं, पण आता पुन्हा फिलीसचा एवरोमवर कायदेशीर काहीच अधिकार राहिला नाही. एवरोमचीही आपल्या ‘आजी’शी नातं तोडण्याची कोणतीही इच्छा नव्हती. तो तिला दुसरी ‘आई’च मानत होता. त्यामुळे त्याच्याच आग्रहानुसार फिलीस यांनी एवरोमला दत्तक घेऊन आपला मुलगा केलं. त्या वेळी त्याचं वय होतं ४५ आणि आपल्या पत्नी-मुलासह या दत्तक विधानाला तो हजर होता!