जगभर : सिंगापूर- इथे गटाराचं पाणीही पिऊ शकता!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 08:16 AM2021-08-18T08:16:19+5:302021-08-18T08:16:38+5:30
Worldwide: सिंगापूरनं पाण्याच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी हा नवा उपाय शोधला आहे. त्यासाठी हा देश दरवर्षी कोट्यवधी डॉलर्सचा खर्चही करतो.
तुम्ही कितीही अवघड परिस्थितीत असाल, तरी गटाराचं, सांडपाणी तुम्ही प्याल? दुर्दैवाने काेरोनाकाळात काही जणांना तेही करावं लागलं, त्याचे फोटो, व्हिडिओही व्हायरल झाले; पण एखादा देशच लोकांना पिण्यासाठी ‘सांडपाणी’ देत असेल तर?- ..तर त्याला म्हणायचं ‘विज्ञानाची प्रगती आणि काळाची गरज’!
सिंगापूरनं पाण्याच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी हा नवा उपाय शोधला आहे. त्यासाठी हा देश दरवर्षी कोट्यवधी डॉलर्सचा खर्चही करतो.
हा एक छोटंसं बेट असलेला देश. पाण्याचे नैसर्गिक स्रोत मुळातच अत्यंत कमी. पाणी आयात करावं लागतं. त्यासाठी मलेशियासारख्या शेजारी देशांवरही अवलंबून राहावं लागतं; पण पाण्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांनी आता चंगच बांधला असून, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.
या देशात जमिनीपासून अतिशय खोल, साधारण २५ मजली इमारतीपेक्षाही अधिक अंतर असलेल्या ठिकाणी सांडपाणी सोडलं जातं. त्यात अर्थातच गटाराचं, कारखान्यांचंही पाणी आहे. हेच पाणी नंतर मोठमोठ्या पायपांच्या साहाय्यानं वर आणलं जातं आणि त्यावर विविध प्रक्रिया केल्या जातात. हे पाणी इतकं शुद्ध केलं जातं की ते तुम्ही पिऊदेखील शकाल. वाया जाणाऱ्या जवळपास बहुतांश पाण्याचा पुनर्वापर या प्रक्रियेद्वारे केला जातो. समुद्राचं पाणी प्रदूषित होऊ नये याचीही याद्वारे काळजी घेतली जाते, म्हणूनच जमिनीच्या बऱ्याच खाली हे सांडपाणी सोडलेलं असतं. हे पाणी वाहून नेण्यासाठी जवळपास ४८ किलोमीटर अंतरापर्यंत मोठमोठे टनेल्स तयार करण्यात आले आहेत. हायटेक प्लाण्ट्सही उभारण्यात आले आहेत.
सिंगापूरच्या चाळीस टक्के लोकांची पाण्याची गरज या रिसायकल केलेल्या पाण्यामुळे भागते. प्रकल्प अत्याधुनिक करताना २०६० पर्यंत साठ टक्के जनतेला या मार्गाने पाण्याबाबत स्वयंपूर्ण करण्याचा सिंगापूरचा मानस आहे. पुनर्वापर केलेल्या या पाण्याचा उपयोग आज मुख्यत: औद्योगिक कारणांसाठी केला जात असला, तरी पिण्यासाठीदेखील वापरता येईल इतकं ते शुद्ध असतं, असा प्रशासनाचा दावा आहे. म्हणूनच पिण्याचं पाणी ज्या जलाशयांमध्ये, टाक्यांमध्ये साठवलं जातं, त्यातही काही प्रमाणात हे पाणी मिसळलं जातं आणि नळावाटे लोकांच्या घरीही जातं. साठ लाख लोकांपर्यंत हे पाणी पोहोचवलं जातं. जे काही पाणी अगदी अल्प प्रमाणात समुद्रात सोडलं जातं, तेही प्रक्रिया केलेलं असतं, त्यामुळे समुद्र प्रदूषणाचा प्रश्न उद्भवत नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या म्हणण्यानुसार, जगात जवळपास ऐंशी टक्के सांडपाणी त्यावर काहीही प्रक्रिया, शुद्धीकरण न करता परत नैसर्गिक स्रोतांमध्ये टाकलं जातं.
पाण्याबाबत सिंगापूरचं धोरण अतिशय स्पष्ट आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब गोळा करा, जपून वापरा आणि जोपर्यंत तो पूर्णत: संपत नाही, तोपर्यंत त्या थेंबाचा वापर करा!
सिंगापूरच्या पाणी पुनर्वापर विभागाच्या प्रमुख आणि मुख्य इंजिनीअर लो पेई चिन म्हणतात, आमची पाण्याची गरज भागविण्यासाठी पाण्याच्या अगदी छोट्यात छोट्या स्रोतांच्याही आम्ही शोधात असतो आणि त्यांचा पुरेपूर वापर करून घेतो. सिंगापूरमध्ये जागेचीही खूप मोठी टंचाई आहे. त्यामुळे अनेक प्रयोगांसाठी भूगर्भातील जागेचाही मोठ्या कौशल्याने वापर करून घेतला जातो. त्याचवेळी माणसांना, जमिनीवरील इमारती, इतर गोष्टींना त्याचा थोडाही त्रास होणार नाही, याचीही खबरदारी घेतली जाते. सिंगापूरमध्ये रोज जवळपास नऊशे मिलिअन लीटर (२३७ मिलिअन अमेरिकन गॅलन) पाण्याचं शुद्धीकरण केलं जातं, जे पिण्यायोग्य असतं.
सांडपाणी जिथून जिथून वाहून नेलं जातं, त्या प्रत्येक टप्प्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाऊन पुढच्या टप्प्यात ते आणखी शुद्ध केलं जातं. याशिवाय त्यातले जीवाणू आणि विषाणूही नष्ट केले जातात. त्यामुळे अंतिम टप्प्यापर्यंत ते पूर्णत: शुद्ध आणि निर्जंतुक झालेलं असतं. या संपूर्ण प्रक्रियेला ‘न्यूवॉटर’ (NEWWater) असं म्हटलं जातं. सिंगापूरमध्ये मोठ्या प्रमाणात मायक्रोचिप प्लाण्ट्स आहेत. त्यासाठी शुद्ध पाण्याची गरज असते. शिवाय इमारतींमधील शीतकरण यंत्रांसाठी आणि अगदी पिण्यासाठीही हे पाणी वापरलं जातं.
..तो दिवस फार दूर नाही!
उन्हाळ्यात जेव्हा पाण्याची टंचाई अधिकच जाणवते, तेव्हा पिण्याच्या पाण्याच्या जलाशयांमध्ये हे पाणी सोडलं जातं आणि नळांद्वारे लोकांच्या घरी पोहोचतं.
पाण्याचा पुनर्वापर आणि शुद्धीकरणाचे नवे प्लाण्ट्स सिंगापूर तयार करीत आहे. देशाच्या पश्चिम भागातील लोक त्यामुळे पाण्याबाबत अधिक स्वयंपूर्ण होतील. येत्या चार वर्षांत म्हणजे २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. सिंगापूर त्यासाठी १० बिलिअन सिंगापूर डॉलर्स (७.४ बिलिअन अमेरिकन डॉलर्स) खर्च करणार आहे. यासंदर्भात सिंगापूर नानयांग युनिव्हर्सिटीचे प्रमुख संशोधक स्टीफन वुरेत्झ म्हणतात, पाण्याचा पुनर्वापर ही काळाची गरज आहे; अन्यथा तो दिवस फार दूर नाही, जेव्हा पाण्यावाचून लोक तडफडून मरतील!