अमेरिकेतील निदर्शनांना जगभरातून पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 02:45 AM2020-06-14T02:45:58+5:302020-06-14T02:46:18+5:30
बर्लिन, लंडनसह अनेक शहरांतून समर्थन; परंतु ट्रम्प यांच्याबाबत नेत्यांचा सावध पवित्रा
बर्लिन : कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयडचा पोलिसांच्या अत्याचारात मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेत उसळलेल्या निदर्शनांना जगभरातून पाठिंबा मिळत आहे. याच्या समर्थनार्थ बर्लिन, लंडन, पॅरिससह जगभरातील अनेक शहरांतील रस्त्यांवर लोक उतरले आहेत व मिनेसोटामध्ये फ्लॉडयच्या हत्येबाबत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या टिप्पणीबाबत लोक नाराजी व्यक्त करीत आहेत. तथापि, अमेरिकेच्या पारंपरिक सहयोगी देशाच्या नेत्यांनी ट्रम्प यांच्यावर थेट निशाणा साधलेला नसला तरी आंतरराष्ट्रीय कूटनीती व अंतर्गत रोष याच्यात संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे.
ट्रम्प यांना एका चर्चमध्ये छायाचित्र काढण्यासाठी जायचे असताना व्हाईट हाऊसबाहेरील शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्यांना जबरदस्तीने हटविल्याबाबत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना विचारले असता आधी तर ते २० सेकंद शांतपणे उभे राहून विचार करीत राहिले. नंतर एवढेच म्हणाले की, कॅनडामध्येही व्यवस्थागत भेदभाव होतो. त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा साधा उल्लेखही केला नाही. ते म्हणाले की, भेदभावाच्या विरोधातील लढाईत आम्हाला सहयोगी बनले पाहिजे. आम्हाला तो आवाज ऐकला पाहिजे, शिकले पाहिजे व काही बाबींवर तोडगा काढण्यासाठी परिश्रम केले पाहिजेत.
जर्मन चान्सलर अँजेला मार्केल यांनाही याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आधी काहीच उत्तर दिले नाही. मात्र, वारंवार विचारले असता ट्रम्प यांची राजकीय पद्धत वादग्रस्त आहे, एवढेच त्या म्हणाल्या. ट्रम्प यांच्यावर तुमचा विश्वास आहे का, असे विचारले असता त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. मार्केल मागील १४ वर्षांपासून सत्तेवर असून, आपल्या कोणत्याही सहयोगी देशावर प्रतिक्रिया व्यक्त करीत नाहीत. या मुद्यावर हंगेरीचे व्हिक्टर ओर्बन किंवा इस्रायलचे बेंजामिन नेतन्याहू यासारख्या नेत्यांनीही मौन साधणे पसंत केले. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी फ्लॉयडचा मृत्यू ही भयावह घटना म्हटले आहे. लोकांना अन्यायाला वाचा फोडण्यासाठी निदर्शने करण्याचा अधिकार आहे. फक्त ती शांततापूर्ण असावीत, असे ते म्हणाले.
यांनी केली सडेतोड टीका
स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी अमेरिकेतील निदर्शनांवरील कारवाई अधिनायकवादी असल्याची टीका केली. नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी आपण अमेरिकेतील घटनाक्रमाने खूपच चिंतित असल्याचे मागील आठवड्यात म्हटले होते.
घानाचे राष्ट्राध्यक्ष नाना आकुफो अड्डो यांनी म्हटले आहे की, २१ व्या शतकातही अमेरिकेत वंशवादाची समस्या कायम आहे, ही चांगली गोष्ट नव्हे.
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सी. रामाफोसा यांनी अमेरिकेतील वंशवादावर टीका केली; परंतु ट्रम्प यांचे नाव घेतले नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी याबाबत काहीही टिप्पणी केली नाही; पण त्या देशाच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जाखारोवा यांनी अमेरिकेतील स्थिती हास्यास्पद असल्याची टीका केली.