CoronaVirus: चिंताजनक! अमेरिकेत ऑगस्टमध्ये 42 लाख नवे रुग्ण; डेल्टा विषाणूचे तांडव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 07:21 AM2021-09-03T07:21:39+5:302021-09-03T07:21:56+5:30
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णांचे प्रमाण १०५ टक्क्यांनी वाढले व मृत्यूंच्या आकडेवारीत २६८ टक्के वृद्धी झाली.
वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये कोरोनाच्या डेल्टा विषाणूने हाहाकार माजविला असून, ऑगस्ट महिन्यामध्ये त्या देशात ४२ लाख नवे रुग्ण सापडले. तसेच त्या महिन्यात २६,८०५ अमेरिकी नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमधील मृतांची संख्या तीन पटीने अधिक आहे. ह्यूस्टन, फ्लोरिडासारख्या ठिकाणी बहुतांश रुग्णालये कोरोना रुग्णांनी भरून गेली आहेत. डेल्टा विषाणूमुळे कोरोनाचा प्रसार होत आहे.
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णांचे प्रमाण १०५ टक्क्यांनी वाढले व मृत्यूंच्या आकडेवारीत २६८ टक्के वृद्धी झाली. सध्या अमेरिकेत दर मिनिटाला कोरोनाबाधित होणाऱ्यांची संख्या सुमारे १११ असून दर सेकंदाला २ जणांना संसर्ग होतो. अलाबामा, फ्लोरिडा, हवाई, लुसियाना, मिसिसिपी, ओरेगॉन, वॉशिंग्टन, मिसिसिपी या ठिकाणी कोरोनाने तांडव मांडले आहे.
अमेरिकेत सध्या ४ कोटी ३३ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील ३ कोटी ११ लाख कोरोना रुग्ण बरे झाले. ८५ लाख ३२ हजार रुग्णांवर सध्या तिथे उपचार सुरू आहेत. त्यातील २५ हजार जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. अमेरिकेमध्ये कोरोनामुळे ६ लाख ५९ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.
मास्कविरोधी आंदोलन करणाऱ्यांचा मृत्यू
मास्क घालण्यास विरोध करणारे व रेडिओ होस्ट असलेल्या सहा लोकांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यामध्ये डिक फॅरेल, फिल व्हॅलेन्टाइन, मार्क बर्निअर, कॅलेब वॉलेस, प्रेसली स्टट्स यांचा समावेश आहे. त्यातील कॅलेब वॉलेस हा अवघा ३० वर्षे वयाचा होता. मास्कविरोधी आंदोलन उभारण्यात त्याचा पुढाकार होता.