coronavirus: चिंताजनक! ओमायक्रॉन व्हेरिएंटचे दोन रूपात झाले विभाजन, तज्ज्ञांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 11:02 AM2021-12-09T11:02:14+5:302021-12-09T11:11:01+5:30
coronavirus: कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट असलेल्या Omicron Variant चा सर्वात पहिला रुग्ण हा दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडला होता. WHOने ओमायक्रॉन (बी.१.१.५२९)चा समावेश व्हेरिएंट ऑफ कन्सर्नमध्ये केला आहे. आता या व्हेरिएंटबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे.
लंडन - कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचा सर्वात पहिला रुग्ण हा दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडला होता. डब्ल्यूएचओने ओमायक्रॉन (बी.१.१.५२९)चा समावेश व्हेरिएंट ऑफ कन्सर्नमध्ये केला आहे. आता या व्हेरिएंटबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. B.1.1.529 हा व्हेरिेएंट BA.1 आणि BA.2. मध्ये विभाजित झाला आहे. विषाणूतज्ज्ञांनी सांगितले की, ओमायक्रॉनच्या नव्या लिनिएज BA.2 चे अनेक रुग्ण दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये सापडले आहेत. तज्ज्ञांच्या मते ओमायक्रॉनचा नवा प्रकार शोधून काढणे खूप कठीण आहे.
ओमायक्रॉनमध्ये सुमारे ५० हून अधिक म्युटेशन आहेत. याचा सर्वात पहिला रुग्ण ८ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडला होता. त्यानंतर तो भारतासह ३४ देशांमध्ये पसरला. तज्ज्ञांच्या मते ओमायक्रॉनच्या व्हेरिएंटमध्ये झालेले विभाजन हा शास्त्रज्ञांसाठी खूप औत्सुक्याचा विषय ठरला आहे. कारण तो या साथीमागच्या विज्ञानाला चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी मदत करेल. मात्र सर्वसामान्यांना त्यापासून चिंतीत होण्याची गरज नाही.
तत्पूर्वी डेल्टा व्हेरिएंट (B.1617.2) सुद्धा आधी दोन आणि नंतर तीन व्हेरिएंटमध्ये विभाजित झाला होता. त्यामध्ये डेल्टा प्लसचासुद्धा समावेश होता. त्यानंतर तो सुमारे १०० व्हेरिएंटमध्ये विभाजित झाला होता. मात्र दिलासादायक बाब म्हणजे त्यामुळे फार हानी घडवून आणली नाही. ओमायक्रॉन व्हेरिएंट वेगळा झाल्याने दिल्लीतील इन्स्टिट्युट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनीही ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, B.1.1.529 चा व्हेरिएंट आता BA.1 आणि BA.2 मध्ये विभाजित झाला आहे. त्यामध्ये BA.1 मूळ व्हेरिएंट तर BA.2 मध्ये सुमारे २४ म्युटेशनचा समावेश आहे.
ओमायक्रॉनच्या या दोन व्हेरिएंटला त्यांच्या म्युटेशनच्या आधारावर वेगळे करण्यात आले आहे. यामधील काही म्युटेशन दोन्ही व्हेरिएंटमध्ये सामान्य आहेत. मात्र काही म्युटेशन दोन्ही व्हेरिएंटमध्ये वेगवेगळे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे BA.1 व्हेरिएंटमध्ये एस-जीन दिसून येत नाही, त्यामुळे आरटीपीसीआर चाचणीमध्ये तो दिसून येतो. तर दुसरा व्हेरिएंट असलेल्या BA.2 मध्ये एस जिनची अनुपस्थिती दिसून येत नाही. म्हणजेच ओमायक्रॉनच्या नवा रूपाची माहिती घेणे अधिक कठीण होऊ शकते.