मनातले लिहा अन् कागद फाडा! रागावर नियंत्रण ठेवण्याचा अनोखा मार्ग संशोधकांनी शोधला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 05:29 AM2024-04-16T05:29:17+5:302024-04-16T05:30:16+5:30
राग हा आगीपेक्षा मोठा मानला जातो. आगीवर नियंत्रण मिळवता येते, पण, रागावर नियंत्रण ठेवणे अनेकांसाठी सोपे नसते.
टोकियो : राग हा आगीपेक्षा मोठा मानला जातो. आगीवर नियंत्रण मिळवता येते, पण, रागावर नियंत्रण ठेवणे अनेकांसाठी सोपे नसते. जपानी मानसशास्त्रज्ञांनी रागावर नियंत्रण ठेवण्याचा अनोखा मार्ग शोधल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, इतरांवर रागाविण्याऐवजी त्यावेळच्या भावना कागदावर लिहून कागद फाडला तर राग नाहीसा होतो.
सायंटिफिक रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनाचे प्रमुख लेखक नोबुयुकी कवाई यांनी सांगितले की, भावनांना लिहून काढणे आणि नंतर तो कागद फाडून टाकल्यामुळे रागावर नियंत्रण मिळविणे शक्य होत आहे. आमच्या प्रयोगात काही प्रमाणात राग कमी होईल अशी अपेक्षा होती. पण, राग पूर्णपणे कमी झाल्याचे पाहून आम्हालाही आश्चर्य वाटले. आमच्या शोधाचा उपयोग रागाच्या उपचारात होऊ शकतो. घर किंवा ऑफिसमध्ये रागावर नियंत्रण ठेवल्यास वैयक्तिक जीवनात अन् नोकरीतील नकारात्मकता कमी होऊ शकते, असे संशोधकांनी सांगितले.
१०० विद्यार्थ्यांवर प्रयोग
१०० विद्यार्थ्यांचा प्रयोगात समावेश करण्यात आला. त्यांना २ गटात विभागले गेले आणि सामाजिक विषयांवर मते लिहिण्यास सांगितले. विद्यापीठातील एका पीएच.डी.च्या विद्यार्थ्याने त्याच्या लेखी मताचे मूल्यमापन करताना अत्यंत कमी गुण दिले. तसेच ‘मला विश्वास बसत नाही की एखादा शिक्षित माणूस असा विचार करू शकतो’, अशा नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या, त्यामुळे विद्यार्थी संतापले होते.
...अन् ते रागावत राहिले
विद्यार्थ्यांच्या एका गटाने आपल्या भावना कागदावर लिहून त्याचे तुकडे करून फेकून दिले. या गटाचा राग पूर्णपणे शांत झाला होता. दुसऱ्या गटाने आपल्या भावना लिहून पेपर तसाच ठेवला. त्यांच्यामध्ये कमालीची नाराजी कायम होती. मूल्यांकनकर्त्याचा त्यांना सतत राग येत होता, असे दिसून आले.