भारत-चीन तणाव वाढला! युद्धाच्या तयारीला वेग द्या; शी जिनपिंग यांचे सेनेला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 01:27 PM2020-05-27T13:27:20+5:302020-05-27T13:29:41+5:30
अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारखे देश चीनच्या विरोधात एकवटले आहेत, तर दुसरीकडे तैवान, व्हिएतनामसारखे देशही चीनच्या आडेमुठी भूमिकेला चोख प्रत्युत्तर देत आहेत.
बीजिंगः गेल्या काही दिवसांपासून चीन शेजारील देशांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. शेजारील देशांच्या सीमेमध्ये घुसखोरी करणं, त्यांना धमकी देणं हा कार्यक्रम चीनकडून सातत्यानं सुरू असतो. कोरोनाच्या उत्पत्तीमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या चीननं इतर देशांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारखे देश चीनच्या विरोधात एकवटले आहेत, तर दुसरीकडे तैवान, व्हिएतनामसारखे देशही चीनच्या आडेमुठी भूमिकेला चोख प्रत्युत्तर देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर चीननं युद्धाच्या तयारीला वेग दिला आहे.
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी सैन्याला युद्धाच्या तयारीला वेग देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संपूर्ण ताकदीनं देशाच्या सार्वभौमत्वाचं संरक्षण करण्यास सांगितले आहे. देशातील सत्ताधारी चिनी कम्युनिस्ट पार्टी (सीपीसी)चे सरचिटणीस आणि सुमारे 20 लाख सैन्याचे प्रमुख असलेले 66 वर्षीय शी यांनी येथे चालू असलेल्या संसद अधिवेशनात पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) आणि पीपल्स सशस्त्र पोलीस दलाच्या प्रतिनिधींना संबोधित करताना हे आवाहन केलं आहे.
सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआच्या वृत्तानुसार, शी यांनी सैन्यदलाला सांगितले की, सर्वात वाईट परिस्थितीची कल्पना करा, त्याबद्दल विचार करा आणि युद्धाची सज्जता व प्रशिक्षण वाढविण्यावर भर द्या, सर्व गुंतागुंतीच्या परिस्थितींचा त्वरित व प्रभावीपणे सामना करण्याची तयारी ठेवा. त्याचवेळी राष्ट्रीय सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकासाचे हितांचंही संरक्षण करा. भारत आणि चीन यांच्यात वास्तविक नियंत्रण रेषेच्या (एलएसी) जवळपास 20 दिवसांपासून तणावाची परिस्थिती आहे.
अलिकडच्या काळात लडाख आणि उत्तर सिक्कीममध्ये भारत आणि चीनच्या सैन्याने त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढविली आहे. दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान दोन वेगवेगळ्या ठिकाणी झटापट झाल्यानंतर दोन आठवड्यांनीही दोन्ही बाजूंचा तणाव वाढल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सुमारे 3,500 किमी लांबीचा एलएसी अक्षरशः दोन्ही देशांमधील सीमा निर्धारित करतात.
हेही वाचा
बिनकामी माणसंच सरकार पाडण्याचा विचार करू शकतात, पवार फडणवीसांवर भडकले
CoronaVirus News: आनंद महिंद्रांनी शेअर केला 'खास' फोटो; युजर्सनी दिल्या अशा प्रतिक्रिया
CoronaVirus News: राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का?; राणेंच्या 'त्या' विधानावर फडणवीस बोलले