शी जिनपिंग यांचा जपान दौरा होणार रद्द? जपान-चीनमधील तणाव वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 03:14 AM2020-07-05T03:14:25+5:302020-07-05T03:15:03+5:30
चीनच्या राष्ट्रपतींचा २००८ नंतरचा हा पहिलाच दौरा ठरला होता. शिंजो आबे यांच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या संसद सदस्यांनी सरकारकडे अशी मागणी केली आहे की, शी जिनपिंग यांच्या दौऱ्याबाबत पुनर्विचार केला जावा.
टोकियो : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा जपानचा नियोजित दौरा जपानकडून रद्द केला जाण्याची शक्यता आहे. जिनपिंग यांचा दौरा एप्रिलमध्येच होणार होता. मात्र, कोरोनामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. आता तो रद्दच होऊ शकतो.
चीनच्या राष्ट्रपतींचा २००८ नंतरचा हा पहिलाच दौरा ठरला होता. शिंजो आबे यांच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या संसद सदस्यांनी सरकारकडे अशी मागणी केली आहे की, शी जिनपिंग यांच्या दौऱ्याबाबत पुनर्विचार केला जावा. याचे मूळ कारण हाँगकाँगमध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यात आहे. कारण, जपानच्या १,४०० कंपन्या सध्या हाँगकाँगमध्ये काम करीत आहेत; पण जपानच्या औद्योगिक क्षेत्रातील लोकांना याची काळजी आहे की, चीनचा राष्ट्रीय सुरक्षेबाबतचा कायदा हा हाँगकाँगमधील एकूणच व्यवस्था बदलू शकतो आणि जपानी लोकांच्या अधिकारांची हानी करू शकतो. अलीकडच्या काळात चीनने पूर्व चीन समुद्रात सेनकाकू बेटालगत जहाजे पाठविणे सुरू ठेवले आहे. एप्रिलपासून या भागात चीनचे ६७ तटरक्षक जहाजे दिसली आहेत. त्यामुळे दोन देशांत तणाव वाढलेला आहे.