‘शाहुंगशू’, झेंग लिंगहुआ ... चीनमधले मरण!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 07:58 AM2023-04-14T07:58:06+5:302023-04-14T07:58:40+5:30

‘शाहुंगशू’ हे चीनमधील  समाजमाध्यम. इन्स्टाग्रामसारखं फीचर असलेलं.

Xiaohongshu the death of china zheng linghua | ‘शाहुंगशू’, झेंग लिंगहुआ ... चीनमधले मरण!

‘शाहुंगशू’, झेंग लिंगहुआ ... चीनमधले मरण!

googlenewsNext

‘शाहुंगशू’ हे चीनमधील  समाजमाध्यम. इन्स्टाग्रामसारखं फीचर असलेलं. या शाहुंगशूवर २३ वर्षांच्या झेंग लिंगहुआने तिच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण मोठ्या कौतुकानं आणि उत्साहानं शेअर केला.

 शाहुंगशूवरील फोटोमध्ये गुलाबी केसांची झेंग अतिशय आनंदात दिसत होती. हा फोटो तिने अंथरुणाला खिळलेल्या आपल्या आजोबांसोबत काढला होता आणि या फोटोसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली होती. तिला संगीतात ग्रॅज्युएशन करण्यासाठी ‘ईस्ट चायना नाॅर्मल युनिव्हर्सिटी’मध्ये प्रवेश मिळाला होता. ग्रॅज्युएशन स्कूलमध्ये प्रवेश मिळाला यापेक्षाही आजोबा मला या स्कूलमध्ये शिकताना पाहू शकतील या विचारानंच ती खूश झाली होती. आपला हा आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा यासाठी तिने शाहुंगशूवर फोटो आणि पोस्ट टाकली होती. पण तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही. तिचा फोटो ट्रोल झाला.

फोटोखाली तिने दिलेली कॅप्शन बदलून विचित्र अवमानकारक मजकूर टाकला गेला. तिच्या गुलाबी केसांना ट्रोलर्सनी लक्ष्य केलं होतं. चीनी मुलीचे गुलाबी केस कसे असू शकतात, असा सवाल तिला विचारला गेला.  तसेच फोटोतल्या तिच्या आजोबांबरोबर तिचे नको ते संबंध जोडले गेले. यामुळे झेंग हादरली.  तिला या सर्व प्रकाराने नैराश्यानं गाठलं. औषधोपचार सुरू झाले. आजार इतका वाढला की तिला दवाखान्यात दाखल केलं गेलं. आणि जानेवारीत तिचा मृत्यू झाला. झेंगच्या मैत्रिणींनी तिच्या मृत्यूला ट्रोलर्सना जबाबदार धरलं.

लिऊ हानबो सेंट्रल हेनान प्रांतातील इतिहासाची शिक्षिका. नोव्हेंबरमध्ये तिचा मृत्यू झाला. कारण तेच : ऑनलाइन ट्रोलिंग. लिऊ ऑनलाइन इतिहासाचा वर्ग घ्यायची. पण ट्रोलर्सनी तिच्या या क्लासमध्ये वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे आणण्यास सुरुवात केली. वर्ग सुरू असताना मध्येच काहीबाही बोलणे, मोठ्याने संगीत लावणे, ऑनलाइन क्लासमधील लिखित संभाषणाला बीभत्स रूप देणे या मार्गाने ट्रोलर्स तिला त्रास देत होते.  ती या गोष्टींना कंटाळून गेली होती आणि अखेर तिचा मृत्यू झाला.

मार्च महिन्यात चीनमधील ऑनलाइन इन्फ्ल्यूएन्सर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सून कॅनबो याने आत्महत्या केली. त्याच्या बायकोनं या आत्महत्येस समाजमाध्यमांवरील ट्रोलिंगला जबाबदार धरलं. २०२१ मध्ये सूनने शॅनडाॅग ते तिबेट असा ४,००० किलोमीटरचा प्रवास ट्रॅक्टरने केला. त्यावर त्याने तयार केलेली फिल्म समाजमाध्यमावर टाकली.  यानंतर तो स्टार झाला, पण नंतर सोशल मीडियावरील त्याच्या काही फाॅलोअर्सने त्याला अपमानित करणाऱ्या कमेंट्स टाकून  ट्रोल केलं, सून नैराश्यात गेला. त्याने स्वत:चं आयुष्य संपवलं. 

चीनमध्ये सोशल बुलिंग आणि ऑनलाइन ट्रोलिंगने  गंभीर रूप धारण केलं आहे.  ताजा अभ्यास सांगतो की, चीनमधल्या सोशल मीडियावर १० पैकी ४ जणांना ट्रोलिंगचा, गैरवर्तनाचा सामना करावा लागतो. १६ टक्के सोशल बुलिंगच्या बळींच्या मनात आत्महत्येचे विचार येतात. ४२ टक्के लोकांना बुलिंग आणि ट्रोलिंगमुळे अनिद्रा, भीती या आजारांचा सामना करावा लागतो तर ३२ टक्के लोक ऑनलाइन ट्रोलिंगमुळे नैराश्यात गेले आहेत. 

चीनच्या प्रतिमेला गालबोट लावणाऱ्या, जगाच्या नजरेत चीनची प्रतिमा डागाळणाऱ्या लोकांना समाजमाध्यमांवर ट्रोल केलं जातं. धमक्या दिल्या जातात. अपमानित केलं जातं.  फॅंग फॅंग यांच्या चीनमधील कोविड काळावर लिहिलेल्या ‘वुहान डायरी’चा अनुवाद मायकेल बेरी यांनी केला, त्यांनाही ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. चीनमध्ये पुन्हा आलात तर मारून टाकण्याची धमकी देण्यात आली.  फॅंग फॅंगने वुहान डायरी लिहून जगाला चीनविरोधात आक्रमण करण्याचं शस्त्र दिल्याचा तिच्यावर आरोप केला गेला. ‘द न्यूयाॅर्कर’च्या लेखिका असलेल्या फॅन जियांग आणि त्यांच्या आईला राष्ट्रवादी चीनी लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला. कारण फॅन यांनी कोरोना काळात आईने एका दुर्धर आजाराशी कसा संघर्ष केला ते समाज माध्यमावर प्रसिद्ध केलं. यासाठी मायलेकींना देशद्रोही ठरवलं गेलं.  हे ऑनलाइन ट्रोलिंग आणि बुलिंग अजून किती भयानक रूप धारण करेल याची चिंता आज सामान्य चीनी माणसाला सतावतेय. 

कोविडचा दोष
कोविड काळात चीनमध्ये ऑनलाइन ट्रोलिंग, सोशल बुलिंगच्या घटना वाढल्या, असं अभ्यासक सांगतात. लाॅकडाऊनच्या काळात लोकांचा एकाकीपणा वाढला, लोक जास्त प्रमाणात मोबाइलवर ऑनलाइन राहू लागले. मनात जो काही साचलेला   राग, कोंडलेल्या भावना लोक ट्रोलिंग आणि बुलिंगच्या रूपाने व्यक्त करू लागले. नोकऱ्या गेल्यानं, एकाकी पडल्यानं लोकांची असुरक्षितता वाढली आणि ती नकारात्मक पद्धतीने व्यक्त झाली.

Web Title: Xiaohongshu the death of china zheng linghua

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.