यासिन मलिकच्या पत्नीला पाकिस्तानात कॅबिनेट मंत्रीपद; यासिन भोगतोय जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 07:19 PM2023-08-17T19:19:33+5:302023-08-17T19:20:31+5:30
दहशतवादी संघटना JKLF प्रमुख यासिन मलिकच्या पत्नीला पाकिस्तानात कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे.
पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल-हक यांनी मुशाल मलिकला केंद्रीय मंत्रिमंडळात सामील केले आहे. मुशाल मलिक, काश्मीरमधील फुटीरतावादी नेता आणि टेरर फंडिंग प्रकरणात भारतीय तुरुंगात कैद असलेल्या यासिन मलिकची पत्नी आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी राजीनामा दिल्यानंतर अन्वर उल हक पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान झाले आहेत.
डॉनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या काळजीवाहू पंतप्रधानांनी मुशाल मलिकचा 18 सदस्यीय मंत्रिमंडळात समावेश केला असून, पंतप्रधानांची मानवाधिकार विषयक सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. पाकिस्तानमध्ये राहणारी यासिन मलिकची पत्नी मुशाल सातत्याने पाकिस्तानच्या नेत्यांना आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडे पती निर्दोष असल्याने त्याला वाचवण्याचे आवाहन करत आहे.
मुशाल मलिकने 22 फेब्रुवारी 2009 रोजी रावळपिंडीमध्ये यासिन मलिकसोबत लग्न केले. विकिपीडियानुसार, 2005 मध्ये यासिन पाकिस्तान दौऱ्यावर असताना दोघांची भेट झाली होती. मुशाल लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवीधर आहे. मुशाल मलिकची आई, रेहाना हुसैन मलिक, पीएमएल-एन महिला विंगच्या सरचिटणीस होत्या, तर तिचे वडील, एमए हुसैन मलिक, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रज्ञ आणि बॉन विद्यापीठात अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख होते.
यासिन मलिकला जन्मठेप
भारतात अनेक दहशतवादी कारवायांसाठी यासिन मलिक जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याच्या कारवायांना 'रेरेस्ट ऑफ द रेअर' मानून फाशीची शिक्षा देण्याची मागणीही करण्यात आली होती. यासिन मलिकला आयपीसी कलम 121(भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे) अंतर्गत दोषी ठरवण्यात आले, ज्यामध्ये मृत्युदंडाची शिक्षा आहे. टेरर फंडिंग प्रकरणात NIA ने यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पण, यासिन मलिकला गेल्या वर्षी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय मलिकला पाच वेगवेगळ्या खटल्यांमध्ये 10-10 वर्षे आणि तीन वेगवेगळ्या प्रकरणात 5-5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.