युद्धाची वर्षपूर्ती, चिंता वाढली; इस्रायलवर पुन्हा रॉकेट हल्ला तर  इस्रायलचा गाझा, बेरूतमध्ये बॉम्बवर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 11:28 AM2024-10-07T11:28:02+5:302024-10-07T11:28:58+5:30

युरोपमध्ये अनेक शहरांत प्रचंड मोर्चे काढण्यात आले.

year after the war anxiety grew another rocket attack on israel and israel bombed gaza beirut | युद्धाची वर्षपूर्ती, चिंता वाढली; इस्रायलवर पुन्हा रॉकेट हल्ला तर  इस्रायलचा गाझा, बेरूतमध्ये बॉम्बवर्षाव

युद्धाची वर्षपूर्ती, चिंता वाढली; इस्रायलवर पुन्हा रॉकेट हल्ला तर  इस्रायलचा गाझा, बेरूतमध्ये बॉम्बवर्षाव

देर अल-बालाह :इस्रायल-हमास युद्धाला सोमवारी एक वर्ष पूर्ण होत असताना परत एकदा तणाव आणखी वाढवणाऱ्या घटना रविवारी घडल्या. गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ला करण्यात आला, तर इस्रायलने उत्तर गाझा आणि दक्षिण बेरूतवर बॉम्ब वर्षाव केला. त्यात गाझा पट्टीतील मशिदीवरील हल्ल्यात किमान २६ जण ठार झाले. दरम्यान, इस्रायलमधील बीरशेबा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून, १० जण जखमी झाले आहेत.

गाझा पट्टीतून रविवारी इस्रायलवर रॉकेट हल्ला करण्यात आला. दरम्यान, इस्रायलमधील बीरशेबा येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला. इस्रायली संरक्षण अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला २९ वर्षीय अहमद अल-उकबी याने केला. त्याने बसस्थानकावर चाकूने हल्ला करून ८ जणांना जखमी केले, त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. इस्रायली सैन्याने हल्लेखोराला गोळ्या घातल्या.

गाझा पट्टीतील मुख्य रुग्णालयाजवळील मशिदीत विस्थापितांनी आश्रय घेतला असताना त्यावर इस्रायलने हल्ला केला.  शाळेवर झालेल्या हल्ल्यात आणखी चार जण ठार झाले. इस्रायली लष्कराने कोणताही पुरावा न देता दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले असा दावा केला.

४२,००० पॅलेस्टिनी ताज्या हल्ल्यांत ठार झाले आहेत. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. ४२,००० पैकी किती नागरिक आणि किती दहशतवादी हे मंत्रालयाने सांगितले नाही, परंतु मृतांमध्ये अनेक महिला आणि लहान मुलांचा 
समावेश आहे

इस्रायलने उघडली हिजबुल्लाविरुद्ध दुसरी आघाडी

इस्रायल अजूनही गाझामध्ये हमासशी लढत आहे आणि हिजबुल्लाच्या विरोधात लेबनॉनमध्ये नवीन आघाडी उघडली आहे. इराणने गेल्या आठवड्यात इस्रायलवर आंतरखंडीय क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्यानंतर इस्रायलनेही इराणवर हल्ला करण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेने या संघर्षात इस्रायलला महत्त्वपूर्ण लष्करी आणि राजनैतिक पाठबळ दिले आहे. सीरिया, इराक आणि येमेनमधील इराणच्या मित्र असलेल्या अतिरेकी गटांनी यापूर्वीच इस्रायलवर हल्ले सुरू केले आहेत.

गाझा रिकामे करा

इस्रायलने उत्तर गाझा रिकामे करण्याचा नवीन आदेशदेखील जारी केला आहे. युद्धाच्या सुरुवातीच्या आठवड्यातच हा भाग मोठ्या प्रमाणात रिकामा झाला होता. मोठ्या प्रमाणावर विनाश होऊनही ३ लाख लोक तेथे अजूनही राहत आहेत.

विद्यार्थ्यांबाबत भारतीयांना चिंता

इराणमध्ये शिकत असलेल्या शेकडो काश्मिरी तरुणांचे कुटुंबीय त्यांच्या मुलांच्या सुरक्षेबाबत अत्यंत चिंतित आहेत. पश्चिम आशियात भीषण युद्ध होण्याचा धोका वाढला असून, अनेक जण आता आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी तेथे पाठवण्यास टाळाटाळ करू लागले आहेत. एमबीबीएससह व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी खर्चाच्या बाबतीत इराणला परवडणारे मानले जाते. त्यामुळे काश्मीरमधील शेकडो विद्यार्थी तेथील विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास प्राधान्य देतात.

हजारो लोक रस्त्यावर

इस्रायलवरील गटाच्या हल्ल्याला सोमवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी इटलीची राजधानी रोमसह जगभरात अनेक ठिकाणी इस्रायलच्या समर्थनार्थ हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. रोममध्ये हिंसक निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला, तर हजारो पॅलेस्टिनी समर्थक निदर्शकांनी जगभरातील रस्त्यावर युद्धबंदीसाठी उतरण्याची हाक दिली आहे. युरोपमध्ये अनेक शहरांत प्रचंड मोर्चे काढण्यात आले.
 

Web Title: year after the war anxiety grew another rocket attack on israel and israel bombed gaza beirut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.