आधीच युद्ध, त्यात कोरोना; येमेन संकटाच्या खाईत!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 05:05 AM2020-04-20T05:05:24+5:302020-04-20T05:06:25+5:30

येमेनसमोर दुहेरी संकट; नागरिकांची अवस्था अतिशय वाईट

yemen facing war and coronavirus at the same time | आधीच युद्ध, त्यात कोरोना; येमेन संकटाच्या खाईत!

आधीच युद्ध, त्यात कोरोना; येमेन संकटाच्या खाईत!

Next

येमेन
शुक्रवारचीच गोष्ट, येमेनमध्ये पहिलावहिला कोरोनाबाधित सापडला. त्याची तब्येत हळूहळू सुधारते आहे. ते प्रमाण वाढणार नाही, आम्ही कडेकोट बंदोबस्त केला आहे असं येमेनमधून अधिकृतरीत्या सांगण्यात येत आहे. पण सांगणारे आहेत, ते अधिकृत का? नेमके अधिकृत सरकार कुणाचे असा प्रश्नही तिथं आहे.

त्या प्रश्नाच्या खोलात जाण्यापूर्वी हा एक येमेनी शेफ व अरेबिक अनुवादक आहे. गेले अनेक दिवस तो आठवड्यातून दोनदा आपल्या युट्यूब चॅनलद्वारे ‘आयसोलेशनमधले दिवस’ अशी कहाणी सांगतोय. तिथं जगायचं कसं? आनंदानं कसं जगायचं हे सांगतोय इटालियन माणसांना. तो राहतो इटलीत. मिलानमध्ये. एका इटालियन मुलीशी त्यानं चार वर्षांपूर्वी लग्न केलं आणि येमेन सोडलं. सध्या संपूर्ण इटलीत लॉकडाऊन असल्यानं तो इटलीवासीयांना सांगतोय की, ‘आम्ही येमेनमध्ये तर कायमचे आयसोलेट आहोत, जन्मालाच आमच्या लॉकडाऊन पुजलंय. आम्ही कसे जगतो, हे पहा. हेही दिवस जातील, आनंदाने जगा!’

सध्या त्याचं हे चॅनल लोकप्रिय होतं आहे. त्याचं कारण येमेनींच्या जगण्याची कहाणी. येमेनमध्ये युद्ध पेटलं, नंतर अनेक येमेनी युरोपात स्थलांतरित झाले. लॉकडाऊनच्या काळात हा येमेनी शेफ , त्याचं नाव ताहा अल जलाल, युद्धग्रस्त काळातही उमेद पोटाशी धरून येमेनी माणसं कशी जगत आहेत व त्यातून काही उमेद वाटता येतेय का, हे पाहत अनुभव सांगतो आहे.

२०१५ पासून ताहा मिलानमध्ये राहतो. तेथे येऊन त्याने इटालियन मुलीशी त्यानं लग्न केलं. २०१६ ला ते येमेनला त्याच्या कुटुंबाला भेटायला गेले. बेचिराख झालेला देश. माणसं घरात कोंडलेली. परत येताना म्हणजे २०१६ मध्ये त्यांना येमेन व ओमानच्या बॉर्डरवर डिटेन केलं. सगळी कागदपत्रं होती तरी चौकशीसाठी थांबविलं. ते ताहा सांगतो, अशा चौकशीचा अनुभव मला नवा नव्हता, पण माझ्या बायकोला हे नवीन होतं. आम्हाला तीन दिवस लहानशा हॉलमध्ये ठेवलं. तिथं प्रचंड गर्दी. सगळेच देश सोडून निघालेले. तसे सधन, पण देश सोडण्यावाचून पर्याय नसलेले. तीन दिवस पोटापुरतं खायला व पाणी देत. तिथं वायफाय नव्हतं, बाहेरचं जग दिसायचं नाही. तिथून बाहेर पडण्यासाठी कासावीस झालेले लोक. त्यातही आम्ही जगलो. एकमेकांशी दोस्ती झाली. सुख-दु:ख वाटली. मी हेच सांगतोय, माझ्या चॅनलद्वारे की, ‘माणसं प्रेमळ असतात. त्यांच्यावर भरवसा ठेवा. आपली जीवनेच्छा अशी दांडगी असते की, माणूस म्हणून कोणत्याही परिस्थितीत जगू शकतो. हार मानत नाही. तेच आता लॉकडाऊनमध्ये करायची गरज आहे.’

तो म्हणतो, ‘मी परक्या देशात अडकलो आहे. माझं कुटुंब युद्धग्रस्त देशात. त्यांच्या जीविताची खातरी नाही. काय होईल माहिती नाही. तरी आम्ही जगतोच आहोत ना. मग बाकी जग घरात सुरक्षित का नाही जगू शकत?’ ताहा म्हणतोय ते खरं आहे. गेलं दशकभर येमेन धुमसतं आहे. २०११-१२ मध्ये अरब स्प्रिंगनंतर येमेनचे सत्ताधीश अली अब्दुल्ला सलेह यांची सत्ता गेली. त्यांच्या पश्चात गृहयुद्ध भडकलं. २०१४ पासून ते जास्तच गंभीर झालं. युद्धच सरू झालं. बंडखोर ‘हाऊथी’ म्हणवणाऱ्या गटाने एकेक करत येमेनचा भाग ताब्यात घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी लढाई सुरूझाली. एकीकडे युद्ध आणि दुसरीकडे कोरोना अशी स्थिती आहे. माणसं जीव मुठीत धरून जगत आहेत. आता येमेनच्या सीमा बंद केल्या असून जगापासून संपर्क पूर्ण तोडण्यात आला आहे.

संयुक्त राष्टÑसंघानंही सांगितलं की, युद्ध आणि कोरोना त्यापायी जाणारे जीव हे दोन्ही एकदम येमेनला झेपणारं नाही, जरा सबुरीनं घ्या, तुमची आरोग्य यंत्रणा मुळात खिळखिळी आहे, त्यात भर नको.

Web Title: yemen facing war and coronavirus at the same time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.