येमेनचे अध्यक्ष हादी यांना सौदीचा आश्रय
By admin | Published: March 28, 2015 12:03 AM2015-03-28T00:03:51+5:302015-03-28T00:03:51+5:30
युद्धग्रस्त येमेनचे अध्यक्ष अब्राबुह मन्सूर हादी हे सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे आज आले असून, बुधवारी ते गायब झाल्यानंतर प्रथमच त्यांचा थांगपत्ता लागला आहे.
सना : युद्धग्रस्त येमेनचे अध्यक्ष अब्राबुह मन्सूर हादी हे सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे आज आले असून, बुधवारी ते गायब झाल्यानंतर प्रथमच त्यांचा थांगपत्ता लागला आहे. दरम्यान, सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली येमेनमध्ये सुरू असलेल्या हवाई हल्ल्याला आता २४ तास उलटले असून या कालावधीत ३९ नागरिक ठार झाले आहेत.
बुधवारी एडन शहरावर बंडखोरांनी हल्ला केल्यानंतर तेथून हादी पळाले होते. त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यानंतर प्रथमच आज त्यांचा पत्ता कळाला आहे. ते इजिप्तला अरब लीगच्या परिषदेसाठी जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, येमेनमध्ये सौदी अरेबियासह १० राष्ट्रांची चढाई चालूच असून, सना येथील लष्करी तळावर टाकलेल्या छाप्यात बाजूचे रहिवासीही ठार झाले आहेत. या ठिकाणी १२ जण मरण पावले. सनाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या अध्यक्षीय प्रासादाच्या परिसरात तीन वेळा हवाई हल्ले झाले. एडनच्या हवाई तळावरही धुमश्चक्री चालू असून तेथेही नागरिक मारले गेल्याचे वृत्त आहे. (वृत्तसंस्था)
४अध्यक्ष हादी यांनी सनाहून पलायन केल्यानंतर एडन येथे आश्रय घेतला होता. बंडखोरांनी जानेवारी महिन्यात सना ताब्यात घेतले होते व हादी यांना घरीच स्थानबद्ध केले होते. एडनमधून बुधवारी पळाल्यानंतर शुक्रवारी ते रियाध येथे पोहोचले आहेत. सौदी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार येमेनचे अध्यक्ष म्हणून हादी इजिप्तला अरब परिषदेस उपस्थित राहणार आहेत.
४सौदी अरेबियाचे अमेरिकेतील राजदूत अब्देल अल जुबैर यांनी दिलेल्या माहितीनुसार हवाई हल्ल्याची पहिली फेरी यशस्वीपणे पार पडली आहे. हौथी बंडखोराविरोधातील मोहिमेची ही सुरुवात आहे. बंडखोरांना लवकरच सुबुद्धी सुचेल असे अपेक्षित आहे, असेही जुबैर म्हणाले.