होय पाकिस्ताननंच देऊ केलं आम्हाला अणूबाँबचं तंत्रज्ञान - इराण
By admin | Published: October 29, 2015 04:49 PM2015-10-29T16:49:44+5:302015-10-29T16:49:44+5:30
पाकिस्तानचे माजी अध्यक्ष अकबर रफसंजानी यांनी पाकिस्तानकडूनच इराणला अणूतंत्रज्ञान मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
तेहरान, दि. २९ - पाकिस्तानचे माजी अध्यक्ष अकबर रफसंजानी यांनी पाकिस्तानकडूनच इराणला अणूतंत्रज्ञान मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आज गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या एका मुलाखतीमध्ये रफसंजानी यांनी हा खुलासा केला आहे. इराण, लिबिया आणि उत्तर कोरियाला पाकिस्तानी अणूशास्त्रज्ञ ए. क्यू खान यांच्या माध्यमातून दिल्याचा दावा पाकिस्तानी अधिकारी विविध स्तरांवर करत होते त्याला यामुळे पुष्टी मिळाली आहे.
इस्लामी जगताकडे अणूबाँब असायला हवा असं ठाम म्हणणं ए. क्यू. खान यांचं होतं असं रफसंजानी यांनी म्हटलं आहे.
आम्ही युद्धग्रस्त होतो आणि भविष्यकाळात गरज पडलीच तर अणूबाँबचं तंत्रज्ञान बाळगण्याची आवश्यकता होती, आणि पाकिस्ताननं हे तंत्रज्ञान देण्याची तयारी दर्शवल्याचे ते म्हणाले. ए. क्यू. खान यांनी १९८६ मध्ये इराणला भेट दिली आणि तेव्हापासून १९९४ व १९९६ मध्ये अणूबाँब तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व तंत्रज्ञान मिळवण्यासाठी पाकिस्तानने मदत केल्याचे रफसंजानी यांनी स्पष्ट केले. त्यानंतर २००२ मध्ये आणखी प्रगत तंत्रज्ञान इराणने मिळवले.
१९७९ च्या क्रांतीनंतर जर्मनीने इराणशी सहकार्य करण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तानने सहकार्याचा हात पुढे केला आणि आपण स्वत: हा करार करण्यासाठी पाकिस्तानला गेलो होतो असेही रफसंजानी म्हणाले. अर्थात, आपण स्वत: दोनवेळा पाकिस्तानात गेलो, अयातुल्ला खोमेनी एकदा गेले परंतु ए. क्यू. खान यांची भेट पाकिस्तानने घेऊ दिली नसल्याचेही ते म्हणतात.
पाकिस्तान ज्यावेळी झिया उल हक यांच्या हुकूमशाहीखाली होता त्यावेळी पाकिस्तान व इराण यांच्यात अणू सहकार्य करार झाल्याचे रफसंजानी यांनी कबूल केले आहे.
श्रीलंकेतील उद्योगपती मोहमद फारूक व बुहारी सय्यद ताहीर आणि जर्मन इंजिनीअर हेन्झ मेबस हे खान यांच्या टीमचे मुख्य सदस्य होते आणि त्यांनी सेंट्रिफ्यूज, रेखाटनं, गणितीय मांडणी आणि सुटे भाग पुरवण्याचे मान्य केल्याचे रफसंजानी म्हणाले.
शुद्ध केलेल्या युरेनियमपासून बाँब कसा बनवायचा हे देखील ए. क्यू. खान यांच्या टीमने इराणले सांगितले आणि इराणने तीन अणुबाँबसाठी १० अब्ज डॉलर्स देण्याचीही तयारी दर्शवली. इस्त्रायलविरोधात इराणने गरज पडल्यास अणुबाँब वापरावा, मुख्य इस्लामी देशांमध्ये सहकार्य असावे आणि इस्लामी देशांचा अणुबाँब असावा, अमेरिकेची कोंडी करावी अशा अनेक बाबी झिया ते भुट्टो या कालखंडात घडल्या आणि या सगळ्यांमध्ये ए. क्यू. खान यांची भूमिका महत्त्वाची होती. इराणचे तत्कालिन अध्यक्ष रफसंजानी यांनीच आता पाकिस्तानने इराणला अणूबाँब बनवण्याचे तंत्रज्ञान विकण्याचे उघडपणे मान्य केले आहे.