हो गलवानमध्ये भारतीय लष्करासोबतच्या संघर्षात मारले गेले PLAचे सैनिक! अखेर चीनने दिली कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 09:55 AM2020-09-18T09:55:12+5:302020-09-18T10:01:07+5:30
गलवानमध्ये आपले सैनिक मारले गेल्याचे चीनकडून सातत्याने नाकारण्यात येत होते. मात्र आता चीनने या संघर्षात ओढवलेल्या नामुष्कीची अखेरीस कबुली दिली आहे.
बीजिंग - मे महिन्यापासून लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावादरम्यान १५ जून रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवानमध्ये हिंसक झटापट झाली होती. या झटापटीत भारताच्या एका अधिकाऱ्यासह २० जवानांना वीरमरण आले होते. तर चीनचेही ४३ ते ६० सैनिक मारले गेले होते. मात्र गलवानमध्ये आपले सैनिक मारले गेल्याचे चीनकडून सातत्याने नाकारण्यात येत होते. मात्र आता चीनने या संघर्षात ओढवलेल्या नामुष्कीची अखेरीस कबुली दिली आहे. १५ जून रोजी गलवानमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत चिनी सैनिक मारले गेल्याचे चीनने प्रथमच मान्य केले आहे.'
ग्लोबल टाइम्सच्या संपादकांनी गलवानमध्ये झालेल्या संघर्षात चीनचे नुकसान झाल्याचे आणि काही चिनी सैनिक मारले गेल्याचे मान्य केले आहे. ग्लोबल टाइम्स हे चीनच्या पीपल्स डेलीची इंग्रजी आवृत्ती आहे. या वृत्तपत्राचे प्रकाशन हे चीनमधील सत्ताधारी असलेल्या चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या पब्लिकेशनकडून करण्यात येते. या वृतपत्रामधून चीन सरकारची भूमिका सातत्याने मांडली जात असते.
ग्लोबल टाइम्सचे मुख्य संपादक हू झिजिन यांनी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे एक विधान ट्विट करून सांगितले की, गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीत चीनचे सैनिक मारले गेले होते. मात्र माझ्या माहितीप्रमाणे या झटापटीत मृत्युमुखी पडलेल्या चिनी सैनिकांचा आकडा हा भारताच्या मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांपैक्षा कमी होता. एवढेच नाही तर चीनच्या कुठल्याही सैनिकाला भारताने बंदी बनवले नव्हते. उलट चीननेच भारताच्या काही सैनिकांना ताब्यात घेतले होते.
१५ जून रोजी चिनी सैन्याने भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यावर भारतीय जवानांनी त्यांना अडवले होते. मात्र चिनी सैनिकांनी भारताच्या जवानांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता. त्यात भारताच्या २० जवानांना वीरमरण आले होते. तर चीनचे ४३ ते ६० सैनिक मारले गेले होते.
दरम्यान, लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैन्याने केलेला घुसखोरीच्या प्रयत्न केल्यानंतर दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आल्याने सध्या भारत आणि चीनमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला आहेत. दोन्ही देशांकडून या भागात मोठ्याप्रमाणावर सैनिकांची आणि शस्त्रसामुग्रीची तैनाती करण्यात आली आहे. तसेच सध्या दोन्ही देशांमधील तणावाचे केंद्र बनलेल्या पँगाँग त्सो परिसरात भारतीय लष्कराने अनेक उंच शिखरांचा ताबा घेत चिनी सैन्याची कोंडी केली आहे. त्यामुळे चिनी सैन्याचा आणि राज्यकर्त्यांचा तीळपापड होत आहे.
गलवानमध्ये मारले गेले चीनचे ६० सैनिक, चकमकीबाबत मोठा गौप्यस्फोट
गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीमध्ये चीनवर ओढवलेल्या नामुष्कीबाबत काही दिवसांपूर्वी एका अमेरिकन वृत्तपत्राने मोठा गौप्यस्फोट केला होता. १५ जून रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीमध्ये चीनचे ३०-४० नव्हे तर तब्बल ६० सैनिक मारले गेले होते, असा दावा करण्यात आला होता. या संघर्षात भारताच्याही २० जवानांना वीरमरण आले होते. अमेरिकेतील प्रतिष्ठित वृत्तपत्र असलेल्या न्यूजवीकने आपल्या नव्या अंकात याबाबतचा गौप्यस्फोट केला होता. तसेच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या आदेशानुसारच लडाखमध्ये चिनी सैन्याने घुसखोरी केल्याचे या वृत्तात म्हटले होते. चीनच्या घुसखोरीला भारतीय लष्कराने दिलेल्या आक्रमक प्रत्युत्तरामुळे चीनच्या नेतृत्वाला धक्का बसला आहे. गलवानमध्ये १५ जून रोजी झालेल्या संघर्षात भारताच्या २० जवानांना वीरमरण आले होते. तर चीनचे ४३ सैनिक मृत्युमुखी पडल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात या चकमकीत चीनचे ६० सैनिक मागले गेल्याचे न्यूजवीकने म्हटले होते.
सीमेवर गस्त घालण्यापासून भारतीय जवानांना कोणीही रोखू शकत नाही
जगातील कोणतीही शक्ती भारतीय सैनिकांना लडाखमध्ये देशाच्या सीमेवर गस्त घालण्यापासून रोखू शकत नाही, असा कडक इशारा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी चीनला दिला. पूर्व लडाखमध्ये चीनने घुसखोरीचे प्रयत्न सुरू ठेवले असून, त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. त्यासंदर्भात राज्यसभेत केलेल्या निवेदनात राजनाथसिंह यांनी सांगितले की, सीमेवर चीनने सैन्याची मोठी जमवाजमव केली आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतही सज्ज झाला आहे.