CoronaVirus News: होय ‘कोविड-१९’चे गांभीर्य कमी केले; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 12:03 AM2020-09-11T00:03:38+5:302020-09-11T06:38:12+5:30
स्वत:ला म्हटले अमेरिकेचा ‘चिअर लीडर’
वॉशिंग्टन : कोविड-१९ महामारीला मुद्दाम कमी लेखून आपण साथीचे गांभीर्य कमी केले, अशी कबुली अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. आपण अमेरिकेचे ‘चिअर लीडर’ असून लोकांत भीती निर्माण होऊ नये, अशी आपली इच्छा होती, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
प्रसिद्ध अमेरिकी लेखक आणि ‘द वॉशिंग्टन पोस्ट’चे सहयोगी संपादक बॉब वूडवर्ड यांच्या ‘रेज’ नावाच्या नव्या पुस्तकात ही माहिती देण्यात आली आहे. वूडवर्ड यांना दिलेल्या एका मुलाखतीत ट्रम्प यांनी म्हटले की, याचे (कोरोना) गांभीर्य कमी राहावे, अशीच माझी प्रथमपासूनची भूमिका होती. अजूनही त्याला कमी लेखायला मला आवडेल. कारण मी घबराट निर्माण करू इच्छित नाही.
वूडवर्ड यांचे पुस्तक ट्रम्प यांच्या १८ मुलाखतींवर आधारित आहे. डिसेंबर २०१९ ते जुलै २०२० या काळात या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.
पुस्तकातील हा तपशील जाहीर झाल्यानंतर ट्रम्प यांच्यावर टीका होत आहे. तथापि, त्यांनी आपल्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले की, आपल्यासमोर खूप मोठी समस्या आहे, असे ओरडून मला लोकांना घाबरवून सोडायचे नव्हते. आम्हाला संयम दाखविणे आवश्यकच होते. वस्तुस्थिती अशी आहे की, मी या देशाचा ‘चिअर लीडर’ आहे. माझे माझ्या देशावर प्रेम आहे.
पक्षाचे नाव वापरू नका : भाजपच्या सूचना
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनासाठी भाजपचे नाव वापरून नका, असे आवाहन भाजपच्या विदेश व्यवहार विभागाचे प्रभारी विजय चौथाईवाले यांनी अमेरिकेतील पक्ष सदस्यांना केले आहे. च्रिपब्लिकन पक्षाच्या प्रचारात ‘हाऊडी मोदी’ आणि ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमातील व्हिडिओ वापरले जात असल्याचे वृत्त आहे.
या पार्श्वभूमीवर चौथाईवाले यांनी ‘ओव्हरसीज फ्रेंडस् आॅफ बीजेपी’च्या अमेरिकी विभागास लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, प्रचारात वैयक्तिक पातळीवर सहभागी व्हा. पक्षाचे नाव वापरू नका. कारण या निवडणुकीत भाजपची कोणतीही भूमिका नाही.