हो, आम्ही या मातांचे अपराधी आहोत..! 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 09:10 AM2023-03-23T09:10:41+5:302023-03-23T09:11:01+5:30

वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या अनेकानेक सुधारणांमुळं माणसाचं सर्वसाधारण आयुष्य वाढलं. हीच बाब गर्भवती मातांच्या बाबतीतही म्हणता येईल

Yes, we are the culprits of these mothers..! | हो, आम्ही या मातांचे अपराधी आहोत..! 

हो, आम्ही या मातांचे अपराधी आहोत..! 

googlenewsNext

खेड्यापाड्यात, आदिवासी भागात आजही काही म्हातारी माणसं उत्तम शरीरप्रकृतीची आढळतात. त्यांची तब्येत आणि त्यांचे कष्ट, मेहनत तरुणांनाही लाजवेल, अशी असते. अर्थात त्यासंदर्भात अनेकांचं उत्तर असतं, म्हातारं खोड आहे, त्यांनी आजवर चांगलं, सात्त्विक, कुठलीही भेसळ नसलेलं अन्न खाल्लेलं आहे, त्यामुळंच या वयातही त्यांची तब्येत उत्तम आहे आणि इतकी वर्षं ते जगू शकले; पण आता सर्वसाधारणपणे सर्वच लोकांच्या आयुष्याची दोरी म्हटलं तर लांब आणि बळकट झाली आहे. याचं कारण आहे मेडिकल सायन्स.

वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या अनेकानेक सुधारणांमुळं माणसाचं सर्वसाधारण आयुष्य वाढलं. हीच बाब गर्भवती मातांच्या बाबतीतही म्हणता येईल. वैद्यकीय ज्ञान जेव्हा फारसं प्रगत नव्हतं, त्यावेळी अनेक महिलांचा आणि त्यांच्या बाळांचा प्रसुतीदरम्यान मृत्यू व्हायचा. आता हे प्रमाण खूपच कमी झालं आहे. सिझेरियनचं तंत्र विकसित झाल्यानंतर तर गर्भारपणाच्या काळातील मातामृत्यूचं प्रमाण अतिशय खाली आलं आहे. 

पण वैद्यकीय ज्ञानात इतकी प्रगती झाल्यानंतरही जगातील सर्वांत विकसित देशातील; अमेरिकेतील मातामृत्यूचं प्रमाण फारसं कमी झालेलं नाही, उलट गेल्या साठ वर्षांच्या तुलनेत ते वाढलंच आहे, हे एक विचित्र वास्तव आहे. त्यामुळे अख्ख्या जगालाच धक्का बसला आहे. खुद्द अमेरिकेच्या नॅशनल सेंटर फॉर हेल्थ स्टॅटिस्टिक्स आणि सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ॲण्ड प्रिव्हेन्शन या प्रख्यात संस्थांनीच याला दुजोरा दिला आहे. 

सध्याच्या घडीला विकसित आणि उच्च उत्पन्न असलेल्या देशांत अमेरिकेतील मातामृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे. यासंदर्भातली अधिकृत आकडेवारीच सांगते, १९६० च्या मध्यापासून २०२१ मध्ये अमेरिकेत मातामृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही आणखी धक्कादायक बाब म्हणजे अमेरिकेतील या मातामृत्यूंमध्ये कृष्णवर्णीय मातांचं प्रमाण श्वेतवर्णीय मातांच्या तुलनेत किती तरी अधिक आहे. समानतेच्या बढाया मारणाऱ्या अमेरिकेच्या दृष्टीनं ही आणखीच अपमानास्पद बाब आहे. 

२०१९ मध्ये अमेरिकेत गर्भारपणाच्या काळातील मातामृत्यूंची संख्या ७५४ होती. २०२० मध्ये वाढून ती ८६१ झाली. २०२१ मध्ये तर ती १२०५ झाली. अमेरिकेच्याच या अधिकृत आकडेवारीनं सर्वसामान्य जनताही चक्रावली आहे आणि आपल्याच सरकारवर जनतेनं ताशेरे ओढायला सुरुवात केली आहे. गर्भारपणाच्या काळात सुलभ प्रसूती होऊन बाळ जन्माला येणं ही तशी सर्वसामान्य बाब, त्यात कुठल्याही गुंतागुतीच्या शस्त्रक्रियांची किंवा विशेष ज्ञानाची आवश्यकता नसते, तरीही इतक्या मातांचा गर्भारपणाच्या काळात मृत्यू होत असेल, तर ही गोष्ट आपल्या देशासाठी अतिशय लाजिरवाणी आहे, अशा शब्दांत लोकांनीच सरकारला झोडपलं आहे.

नॅशनल सेंटर फॉर हेल्थ स्टॅटिस्टिक्स या संस्थेच्या अहवालानुसार अमेरिकेत २०१९ मध्ये दहा लाख बाळंतपणात २०.१ मातांचा मृत्यू झाला, तर २०२० मध्ये दहा लाख बाळंतपणात २३.८ आणि २०२१ मध्ये ३२.९ मातांचा मृत्यू झाला. ही आकडेवारी अतिशय धक्कादायक मानली जात आहे. हे झालं श्वेतवर्णीय मातांच्या बाबतीत. कृष्णवर्णीय मातांच्या बाबतीत हेच प्रमाण अक्षरश: डोळे गरगरावेत असे आहे. 

२०२१चीच अधिकृत आकडेवारी पाहिली तर अमेरिकेत दहा लाख बाळंतपणात २६.६ श्वेतवर्णीय मातांचा मृत्यू झाला. त्याचवेळी कृष्णवर्णीय मातांचं हे प्रमाण तब्बल ६९.९ मृत्यू इतकं प्रचंड होतं. म्हणजेच श्वेतवर्णीय महिलांच्या तुलनेत कृष्णवर्णीय मातांचा मृत्यू दुपटीपेक्षाही अधिक म्हणजे २.६ पट इतका होता. त्यामुळे अमेरिकेत श्वेतवर्णीयांवर गर्भार मातांच्या बाबतीततही अन्याय केला जातो, त्यांना दुय्यम लेखलं जातं आणि त्यांच्यावर उपचाराच्या बाबतीत चालढकल केली जाते, असे आरोप आता होऊ लागले आहेत. अर्थातच अमेरिकेकडे त्याचं उत्तर नाही. कोविड काळानंतर तर यात फारच मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

अमेरिकेतील प्रसिद्ध प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ इफात अब्बासी होस्किन्स यांनी यासंदर्भात सरकारचे जाहीर वाभाडे काढताना म्हटलं आहे, ‘प्रगत’ म्हणवणाऱ्या अमेरिकेसाठी ही गोष्ट खरोखरच लाजिरवाणी आहे. आमच्या देशात गर्भारपणाच्या काळात मातामृत्यू होतात आणि तेही इतक्या मोठ्या प्रमाणात, ही वस्तुस्थिती आम्ही नाकारू शकत नाही. आम्हाला याचा खरोखरच खेद आहे. या साऱ्या मातांचे आम्ही अपराधी आहोत...

दर दोन मिनिटाला एका मातेचा मृत्यू!
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार गेल्या वीस वर्षांत मातामृत्यूचं प्रमाण सर्वसाधारणपणे एक तृतीयांश कमी झालं असलं तरी दर दोन मिनिटाला एका गर्भवती मातेचा मृत्यू होतो. २०२० मध्ये एकूण मातामृत्यूंपैकी सत्तर टक्के गर्भवती मातांचा मृत्यू उपसहारा आफ्रिकेत झाला. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या तुलनेत हा दर १३६ पटींनी जास्त आहे.

Web Title: Yes, we are the culprits of these mothers..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.