शेतकऱ्याचा पुत्र योशिहिदे सुगा होणार जपानचे नवे पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 02:54 PM2020-09-14T14:54:17+5:302020-09-14T14:54:34+5:30
एलडीपीने आपला नवीन नेता निवडल्यानंतर पुन्हा बुधवारी जपानच्या संसदेत मतदान होईल, जिथे बहुसंख्य आकडा असल्याने एलडीपीच्या नेत्याने जिंकणे अपेक्षित आहे.
टोकियो- जपानच्या पंतप्रधानपदावरून शिंजो आबे पायउतार झाले असून, लवकरच योशिहिदे सुगा यांच्या खांद्यावर ही जबाबदारी येणार आहे. सुगा सध्या जपान सरकारमध्ये मुख्य कॅबिनेट सचिव आहेत. ते शिंझो आबे यांचे विश्वासू आहेत, आबेंचा वरदहस्त असल्यानं नवीन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुगा यांचं नाव आघाडीवर होते. अखेर त्यांनाचा जपानचे पंतप्रधानपद भूषवण्याचा बहुमान मिळणार आहे.
शिंझो आबे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यानं जपानमधील नवीन पंतप्रधानांचा शोध सुरू झाला होता.
ऑगस्टच्या उत्तरार्धात आरोग्याच्या कारणास्तव शिंझो आबे यांनी पंतप्रधानपदाची खुर्ची सोडण्याची घोषणा केली होती. सध्या जपानमध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) सत्तेत आहे. शिंझो आबे यांनी पद सोडत असल्याची अचानक घोषणा केल्यानंतर आशियातील बलाढ्य देशांत खळबळ उडाली होती. या घोषणेचा परिणाम संपूर्ण जगावर दिसून आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिंजो आबे यांना खासगीत बोलावून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
दरम्यान, योशिहिदे सुगा जपानमधील नवे पंतप्रधान असतील, अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. आज म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी जपानच्या सत्ताधारी पक्षामध्ये नवीन नेत्याच्या निवडणुकीवर मतदान झाले. सुगा यांनी ही निवडणूक जिंकली आहे. एलडीपीने आपला नवीन नेता निवडल्यानंतर पुन्हा बुधवारी जपानच्या संसदेत मतदान होईल, जिथे बहुसंख्य आकडा असल्याने एलडीपीच्या नेत्याने जिंकणे अपेक्षित आहे. यानंतर विजेत्या व्यक्तीचा पंतप्रधानपदी राज्याभिषेक केला जाईल. सध्याच्या जपानच्या संसदेची मुदत सप्टेंबर 2021पर्यंत आहे.
सुगांचा राजकीय प्रवास
भारतात सुगा हे पोपटाला म्हटलं जातं. जर 71 वर्षीय सुगा जपानचे पंतप्रधान झाल्यास एका सामान्य नेत्याने सर्वोच्च स्थान गाठल्याची ही रोमांचक गोष्ट होईल.
कार्डबोर्ड कारखान्यात नोकरी, मासेदेखील विकले
योशिहिदे सुगा हा एका शेतकर्याचा मुलगा आहे, त्यांचे वडील स्ट्रॉबेरीची लागवड करीत असत. सुगांचा जन्म जपानमधील अकिता येथे झाला. तेथे हायस्कूलचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते टोकियोमध्ये गेले. सीएनएनच्या अहवालानुसार येथे पोटापाण्यासाठी त्यांना पुठ्ठा(कार्डबोर्ड) कारखान्यात काम करावे लागले व कधीकधी त्यांना मासे बाजारात मासे विकावे लागत होते. खरं तर सुगा कामाबरोबरच विद्यापीठात शिकत होते, नोकरी करून विद्यापीठाची फी भरण्यास त्यांना मदत मिळायची.
चांगल्या पगाराची नोकरी
पदवीनंतर सुगा जपानच्या वेगवान कॉर्पोरेट जगात सामील झाले आणि त्यांनी चांगल्या पगारावर काम करण्यास सुरुवात केली. पण राजकारणाचा संघर्ष त्याची वाट पाहत होता. सीएनएनच्या मते, त्यांचे कोणतेही राजकीय संबंध नव्हते किंवा राजकारणाचा अनुभव नव्हता. परंतु सुगा स्वत: निवडणुका लढविण्यासाठी बाहेर पडले. घरोघरी जाऊन त्यांनी आपली मोहीम सुरू केली. ते एका दिवसांत 300 लोकांच्या घरी जायचे. एलडीपीच्या म्हणण्यानुसार, निवडणूक प्रचार संपेपर्यंत ते सुमारे 30000 लोकांच्या घरात गेले होते. पक्षाच्या म्हणण्यानुसार, निवडणुका प्रचारात सुगांचे 6 जोडी बूट फाटले होते. जपानी राजकीय तज्ज्ञ म्हणतात की, सुगा हे सेल्फ मेड मनुष्य आहे, त्यांच्या मागे संघर्षाची कहाणी आहे.
2012पासून आबे यांच्याबरोबर
सुगा आणि आबे 2012पासून एकत्र आहेत. सुगा आता शिंजो आबेंचा उजवा हात मानला जातो. जपानमध्ये सुगा हा एक व्यावहारिक नेते मानले जातात आणि त्यांच्याबद्दल अशी धारणा आहे की, ते पडद्यामागे राहून निर्णय घेतात.