‘तुम्ही लादेनचे मित्र आहात’ शरीफना श्रोत्यानेच ऐकविले
By admin | Published: October 24, 2015 02:59 AM2015-10-24T02:59:34+5:302015-10-24T11:03:00+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना शुक्रवारी भाषणात निषेधकर्त्या श्रोत्याकडून ‘तुम्ही ओसामा बिन
वॉशिंग्टन : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ
यांना शुक्रवारी भाषणात निषेधकर्त्या श्रोत्याकडून ‘तुम्ही ओसामा बिन लादेनचे मित्र असल्याचे’ ऐकावे लागले. शिवाय या श्रोत्याने अस्वस्थ बलुचिस्तान प्रांत स्वतंत्र करा अशी मागणीही केली.
येथील युएस इन्स्टिट्यूट आॅफ पीस या स्वतंत्र वैचारिक संस्थेत शरीफ भाषण करीत असताना हा निदर्शक मध्येच उभा राहून त्याने बलुचिस्तान प्रांतात लष्कराकडून कार्यकर्त्यांचे अपहरण होऊन त्यांचा छळ करून नंतर मारून टाकले जात असल्याचा गंभीर आरोप केला. त्याच्या हातात ‘बलुचिस्तान मुक्त करा’ (फ्री बलुचिस्तान) असे लिहिलेला फलकही होता. या नंतर लगेचच सुरक्षा सैनिकांनी त्याला सभागृहाबाहेर हलविले. या गडबडीत शरीफ यांना किंचित काही वेळ भाषण थांबवून नंतर ते सुरू करावे लागले.
स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी फुटीरवाद्यांशी पाकिस्तानी लष्कराला अनेक वेळा लढावे लागले आहे.
२००६ मध्ये तत्कालीन अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी बलूच आदिवासी नेते नबाव अकबर बुगती यांच्यावर बाँब टाकण्याचे आदेश दिले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला व तेव्हापासून नव्याने तेथे फुटीरवादी चळवळ सुरू झाली. बलुचिस्तानातील फुटीरवादी चळवळ आम्ही जिंकल्याचा दावा पाकिस्तानचे लष्कर करीत असून बलुची कार्यकर्ते मात्र लष्कर कार्यकर्त्यांचे अपहरण करून त्यांचा छळ करते व नंतर त्यांची हत्या करते असा आरोप करीत आहेत. यामुळे तेथील संघर्ष अधिक चिघळत चालला आहे.