S. Jaishankar : "... तुम्ही कोणाला मूर्ख बनवू शकत नाही," एस. जयशंकर यांनी अमेरिकेला झापलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 07:55 AM2022-09-27T07:55:38+5:302022-09-27T07:56:21+5:30
रशियासोबतच्या मैत्रिवरही केलं भाष्य.
वॉशिंग्टन : अमेरिका-पाकिस्तान संबंधांवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करून हे संबंध अमेरिकेच्या हिताचे नसल्याचे स्पष्ट केले. या संबंधांचा ना पाकला लाभ झाला ना अमेरिकेला, असे ते म्हणाले.
ते येथे भारतीय-अमेरिकी नागरिकांसोबतच्या संवाद कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी अमेरिकेने एफ-१६ लढाऊ विमानांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी पाकला पॅकेज दिल्याबाबतच्या एका प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर यांनी ही रोखठोक भूमिका मांडली. पाकला पॅकेज दिल्यावरून भारतात अमेरिकेवर टीका झाली होती. तेव्हा पाकला आर्थिक साहाय्य केले नसून, एफ-१६ विमानांच्या सुट्या भागांची विक्री केली आहे. दहशतवादाला आळा घालण्यासाठी हे करण्यात आले, असे स्पष्टीकरण अमेरिकेने दिले होते.
त्यावर जयशंकर म्हणाले की, दहशतवादाला आळा घालण्यासाठी हे केले, असे स्पष्टीकरण देऊन तुम्ही कोणाला मूर्ख बनवू शकत नाही. एफ-१६ विमाने कुठे तैनात केली जाऊ शकतात आणि ती किती विध्वंस घडवून आणू शकतात, हे तुम्हाला चांगल्याप्रकारे माहीत आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, काही लोक पक्षपाती असतात. त्यांची भारतात सरशी होत नाही. ते देशाच्या बाहेर जिंकण्याचा प्रयत्न करतात.
पक्षपाती वार्तांकनाबद्दल अमेरिकी माध्यम घराण्यांवर टीका
मी माध्यमांत येणारी वृत्ते वाचतो. काही वृत्तपत्रे काय लिहिणार आहेत हे तुम्हाला चांगल्याप्रकारे ठाऊक असते. येथेही असे एक वृत्तपत्र आहे, असे जयशंकर म्हणाले. तेव्हा उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यांनी टाळ्या वाजवून जयशंकर यांच्या विधानाचे समर्थन केले.
...म्हणून रशियाशी मैत्री
रशियाच्या सैन्य उपकरणांवर भारताचे अवलंबित्व आणि रशियासोबत मजबूत संबंध असण्याचे हे कारण नाही की, भारताने ही उपकरणे मिळविण्यासाठी अमेरिकेशी संपर्क केला नाही, असे मत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, १९६५ पासून जवळपास ४० वर्षांपर्यंत भारतात अमेरिकेचे कोणतेही सैन्य उपकरणे आली नाहीत. याच काळात भारत- सोव्हिएत, भारत - रशिया संबंध मजबूत झाले. ते म्हणाले की, टाळी दोन्ही हातांनी वाजते. असे नाही की, सर्व समस्या अमेरिकेकडून होत्या. मला वाटते आज हे संबंध वेगळ्या स्तरावर आहेत. अनेक क्षेत्रात एकत्र काम करण्याची शक्यता आहे.